जयशंकर यांचे टीकास्त्र, हल्ल्यानंतर 30 मिनिटांनी पाकिस्तानला माहिती दिल्याचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने 7 मे या दिवशी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले करण्याच्या आधीच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी त्या देशाला या हल्ल्यांची माहिती दिली होती, हा काँग्रेसचा आरोप धडधडीत असत्य आहे. आम्ही हा हल्ला केल्यानंतर 30 मिनिटांनीं ही माहिती आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार पाकिस्तानला दिली होती, असे स्पष्टीकरण परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी परराष्ट्र व्यवहार विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत दिले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जयशंकर यांच्यावर हा आरोप केला होता. तसेच त्यांनी हल्ल्याची माहिती आधी फोडल्यामुळे पाकिस्तानला तयारीला वेळ मिळाला. त्या परिस्थितीत भारताची किती विमाने पडली, असा प्रश्नही राहुल गांधी विचारला होता आणि खापर जयशंकर यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी जयशंकर यांच्या विधानाचा दिनांक आणि वेळ नसलेला व्हिडीओही दाखविला होता. तथापि, तो व्हिडीओ बनावट असल्याचे स्पष्टीकरण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) सत्य पडताळणी केल्यानंतर प्रसिद्ध केले होते.
बैठकीत शाब्दिक चकमक
सल्लागार समितीच्या या बैठकीत सत्ताधारी सदस्य आणि विरोधी सदस्य यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक या मुद्द्यावरुन उडाली होती. विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांच्या आरोपांचा पुनरुच्चार केल्याने संतप्त झालेल्या सत्ताधारी सदस्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार प्रतिहल्ला केला होता. त्यानंतर त्वरित जयशंकर यांनी घटनाक्रम स्पष्ट करुन नेमके काय घडले होते, त्याची माहिती दिली.
युद्ध भडकू नये म्हणून…
भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर प्रथम पीबीआयने ही माहिती प्रसारित केली होती. त्यानंतर भारत सरकारच्या वतीने जयशंकर यांनी ही माहिती पाकिस्तानला दिली. आम्ही पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीवर किंवा लष्करी तळांवर हल्ले केलेले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर या घडामोडीपासून (म्हणजेच हल्ल्यापासून) स्वत:ला दूर ठेवू शकते, असा संदेश देण्यात आला होता. युद्ध भडकू नये, म्हणून ही दक्षता घेण्यात आली होती. तथापि, काँग्रेसने राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आणि भारताच्या सेनादलांविरोधात संशय निर्माण करण्यासाठी हे आरोप केले आहेत. ते धादांत खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे जयशंकर यांनी बैठकीत स्पष्ट केले.
भारताची योजना
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या मर्मावरच आघात करण्याची योजना सज्ज केली होती. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय उध्वस्त करण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यानुसार भारताच्या वायुदलाने ही कामगिरी चोखपणे केली आहे. आतापर्यंत कोणत्याही सरकारने दहशतवादी संघटनांचे कंबरडे अशा प्रकारे मोडले नव्हते. आम्ही यात यशस्वी झालो आहोत, असे प्रतिपादन जयशंकर यांनी केले.
पाकिस्तान एकाकी
भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केल्यानंतर, जगातील 200 हून अधिक देशांपैकी केवळ 3 देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले आहेत. यावरुन हे स्पष्ट होते, की दहशतवादाशी भारताने चालविलेल्या संघर्षाला जगातील जवळपास सर्व देशांचा पाठिंबा आहे. पाकिस्तान या मुद्द्यावर विश्वसमुदायामध्ये एकाकी पडला आहे. भारताने चालविलेले ‘सिंदूर अभियान’ यापुढेही चालविले जाणार आहे. जोपर्यंत पाकिस्तान आगळीक करत राहील, तो पर्यंत त्याला असाच धडा शिकविला जाईल. पाकिस्तानशी चर्चा केवळ पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि दहशतवाद या दोनच मुद्द्यांवर केली जाईल. कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी आम्ही स्वीकारणार नाही. या संबंधातील भारताची भूमिका ठाम आहे. सिंधू जलवितरण कराराची स्थगितीही पुढे चालविली जाईल. दहशतवादाचा कणा मोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ राहणार नाही, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षांवर घणाघात
ड खोटे आरोप करुन काँग्रेसकडून देशात सैन्याविषयी भ्रम पसरविण्याचा प्रयत्न
ड इतिहासात प्रथम सिंदूर अभियानातून दहशतवादाच्या मर्मावर झाला आघात
ड पाकिस्तानशी चर्चा केवळ पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या संबंधात केली जाणार









