उमेदवार निवडीची कसरत अंतिम टप्प्यात : दिल्लीत खल झाल्यानंतर अंतिम निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवार निवडीविषयी जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे. काँग्रेसने उर्वरित 100 मतदारसंघांमधील उमेदवारांची संभाव्य यादी तयार केली असून 4 एप्रिल रोजी नवी दिल्लीत हायकमांडशी चर्चेनंतर अंतिम यादी तयार केली जाणार आहे. तर भाजपने शनिवार आणि रविवारी जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत. एक-दोन दिवसात यादी तयार केली जाईल. 6 एप्रिल रोजी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची होईल. येथे खल झाल्यानंतर यादीबाबत अंतिम निर्णय होऊन त्याच दिवशी उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने यापूर्वीच 124 मतदारसंघाती उमेदवार जाहीर केले आहेत. आता दुसरी यादी जाहीर करणे बाकी आहे. पहिल्या यादीत विद्यमान आमदार, विजयाची खात्री असणारे, माजी मंत्र्यांचा समावेश केला होता. मात्र, दुसऱ्या यादीला अंतिम स्वरुप देणे काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे. 100 उमेदवारांची अंतिम निवड करण्यासाठी 4 एप्रिल रोजी सायंकाळी नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत चर्चेनंतर त्याच दिवशी उमेदवारांची नावे जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
भाजपने अद्याप उमेदवारांची एकही यादी जाहीर केलेली नाही. पक्षातील नाराजी उफाळून येऊ नये, यासाठी भाजपने सावध भूमिका घेतली आहे. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस बेंगळूरमधील एका खासगी रिसॉर्टमध्ये जिल्हा भाजप पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक घेऊन मते जाणून घेतली आहे. त्यानुसार उमेदवार निवडले जातील. 6 एप्रिल रोजी भाजपच्याही निवडणूक समितीची बैठक होणार असून या ठिकाणी उमेदवारांची नावे अंतिम केली जातील. त्याच दिवशी सायंकाळी भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजप एकाच टप्प्यात सर्व 224 उमेदवारांची नावे जाहीर करणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.









