तेलंगणात दुभाजकाला धडकून उलटली कार
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्हय़ात एका रस्ते दुर्घटनेत काँग्रेस नेत्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत कारमधील अन्य दोघेजण बचावले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत चौकशी सुरू केली आहे. राजेंद्रनगर येथे काँग्रेस नेते फिरोज खान यांची मुलगी तानिया ही स्वतःच्या कारमधून प्रवास करत होती. यादरम्यान तिची कार एका दुभाजकाला धडकून उलटली होती. कारमधील अन्य दोघेजण मात्र बचावले आहेत. या दुर्घटनेत तानियाला गंभीर ईजा झाली होती. तिला त्वरित उस्मानिया रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.









