केसीआर यांच्या बीआरएसमध्ये करत आहेत प्रवेश
तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांवर 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीपूर्वी तिकिटवाटपावरून काँग्रेसमध्ये सुरू झालेले बंडाचे सत्र अद्याप संपलेले नाही. प्रदेश काँग्रेसमध्ये असंतोष कायम असून वरिष्ठ नेत्यांपासून माजी मंत्री देखील पक्षाला रामराम ठोकून भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) गोटात सामील होत आहेत. केसीआर यांचा बीआरएस देखील काँग्रेसमधील नाराजांना स्वत:च्या बाजूने वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
उमेदवारी न मिळाल्याने राजीनामा
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री नागम जनार्दन रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. नागम यांनी स्वत:चा राजीनामा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविला आहे. उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसमधील जुने नेते पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहेत.
विजयाच्या हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात बीआरएस
2014 पासून के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस (पूर्वीचा टीआरएस) सत्तेवर आहे. बीआरएस यावेळी विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी आतूर आहे. निवडणुकीच्या मैदानात जिंकण्याची क्षमता असणाऱ्या नेत्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे काँग्रेसने पक्षातील बंडाविषयी म्हटले आहे.
केसीआर यांची बंडखोर नेत्यांनी घेतली भेट
रेड्डी यांना बीआरएसमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव मिळाला होता, त्यानंतरच त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. तत्पूर्वी रविवारी बीआरएस अध्यक्ष केसीआर यांची त्यांनी भेट घेतली होती. तर काँग्रेसचे दिवंगत नेते पी. जनार्दन रेड्डी यांचे पुत्र माजी आमदार पी. विष्णुवर्धन रेड्डी यांनीही केसीआर यांची भेट घेतली होती. ही भेट ज्युबली हिल्स मतदारसंघात मोहम्मद अझरुद्दीन यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर झाली होती.
काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 100 उमेदवार घोषित पेले आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे अनेक नेते बीआरएसच्या वाटेवर आहेत. प्रदेश काँग्रेस मुख्यालयात प्रवेश न मिळाल्याने विष्णुवर्धन रेड्डी यांच्या समर्थकांनी तेथील पोस्टर्स फाडून दगडफेक केली होती. तर दुसरीकडे काँग्रेसने खैरताबाद मतदारसंघात विष्णूवर्धन रेड्डी यांच्या भगिनी विजयारेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.
बीआरएसला प्रथम पसंती
यापूर्वी माजी आमदार एर्रा शेखर, माजी मंत्री पोन्नाला लक्ष्मीया हे काँग्रेसमधून बाहेर पडत बीआरएसमध्ये सामील झाले आहेत. तर काँग्रेस नेते सुभाष रेड्डी हे उमेदवारी न मिळाल्याने रडल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विजयाची शक्यता पाहून पक्षाने उमेदवारांची निवड केल्याचा दावा तेलंगणा काँग्रेसचे उपाध्यक्ष चमाला किरण कुमार रेड्डी यांनी केला आहे. काँग्रेसकडून असंतुष्ट नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे माजी खासदार विवेक वेंकटस्वामी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.









