संसद सदस्यत्व रद्द झाल्यावर पहिलाच दौरा
वृत्तसंस्था/ वायनाड
काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी संसद सदस्यत्व रद्द झाल्यावर पहिल्यांदाच 11 एप्रिल रोजी म्हणजेच आज स्वतःचा मतदारसंघ वायनाडचा दौरा करणार आहेत. या दौऱयात राहुल गांधी हे रोड शो करतील तर काँग्रेसकडून यादरम्यान शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
वायनाडच्या कलपेट्टामध्ये एका जाहीरसभेसोबत रोड शोचे आयोजन होणार आहे. यावेळी राहुल गांधी हे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतील. या कार्यक्रमात एसआयसीसी सदस्य आणि केपीसीसीचे नेतेही सामील होणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे 24 मार्च रोजी संसद सदस्यत्वासाठी अपात्र ठरले होते. अशा स्थितीत केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. 23 मार्च रोजी गुजरातच्या सूरत येथील सत्र न्यायालयाने मोदी समुदायाचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती.









