ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या अडीच वर्षांपासून अनेक वाद होऊन देखील अद्याप एकत्रित असलेल्या महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद आता समोर येऊ लागले आहेत. राज्यात भाजपचा एकत्रितपणे सामना करणारे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मैत्रीला गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांदरम्यान पार तडा गेल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडीत बिघाडी करत गोंदियात राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली तर भंडाऱ्यात कॉंग्रेसने भाजपच्या बंडखोरांना सोबत घेऊन राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले असल्याचे दिसून आले. यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट पाठीत सुरा खुपसण्याचं काम केल्याचा आरोप केला आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत पटोले विरुद्ध पटेल अर्थात नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल हा वाद पुन्हा एकदा उघड झाला. त्यामुळे नाना पटोलेंनी त्यावरून आपल्या ट्विटर हँडलवर खरमरीत शब्दांत ट्वीट केलं असून थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, दोन्ही पक्षांनी आघाडी धर्माचे पालन होत नसल्याचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याचा थेट आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तर गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने भाजपला कशी साथ दिली, याची माहिती दिल्लीत जाऊन कॉंग्रेसच्या हायकमांडला सांगणार असल्याचे पटोले यांनी पत्रकारांना सांगितले.
या नाट्यमय घडामोडींनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. गोंदियामध्ये राष्ट्रवादीने आमच्यासोबत दगाफटका केल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ‘मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू!’ अशा आशयाचे ट्विट पटोले यांनी केले आहे.
“भाजपासोबत जायचंय हे एकदा सांगून टाका”
“आम्हाला एकदा त्यांनी सांगून द्यावं की त्यांना भाजपासोबत जायचंय. ते एकदा पहाटे गेलेच होते भाजपासोबत. आम्हाला त्याच्याशी घेणंदेणं नाही. पण सोबत राहून पाठीवर वार करण्याची भूमिका काँग्रेसला कधीही मान्य होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागायला हवा ही भूमिका काँग्रेसची आहे”, असं देखील ते म्हणाले.