राजाराम कारखाना निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महाडिक- पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; चुरशीच्या लढतीमुळे जिह्यात राजकीय घुसळण; अखेरच्या दिवशी सभासदांना घडले लक्ष्मीदर्शन
कोल्हापूर कृष्णात चौगले
राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून सुऊ असलेल्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. रविवारी मतदान होत असून 21 जागांसाठी 44 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखालील आघाड्यांमध्ये चुरशीची लढत होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहीर प्रचारसभा, मेळावे, कोपरा सभा, पदयात्रा, प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. पदयात्रा, मोटरसायकल रॅलीद्वारे नेत्यांसह उमेवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शनिवारी रात्रभर छुप्या रणनितीचा खेळ रंगणार असल्यामुळे ‘कार्यकर्त्यांनो मतदान पूर्ण होईपर्यंत गड सांभाळा’ असे नेत्यांनी आवाहन केले आहे. गेल्या दोन दिवसांत सभासदांना लक्ष्मीदर्शन घडल्यामुळे मतदान रूपी प्रसाद कोणाच्या पदरात पडणार हे मंगळवारी मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.
गेल्या आठवड्याभरात महाडिक- पाटील गटाच्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराचा धुरळा उडला. प्रचारसभा, पदयात्रा, रोडशो, प्रत्यक्ष गाठीभेटी, कोपरा सभांनी शुक्रवारचा दिवस गाजला. महिनाभरापासून सुऊ असलेल्या जाहीर प्रचारास पूर्णविराम मिळाला असला तरी शनिवारी दिवसभर आणि रात्रभर छुप्या भेटीगाठी अन् फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येणार आहे. सद्यस्थितीत वैयक्तिक गाठीभेटी, अंतर्गत बैठका आणि पडद्याआडच्या घडामोडीं सुऊ आहेत. रविवारी मतदान होत असल्यामुळे एक-एक मतदान आपल्याच पारड्यात कसे पडेल यासाठी उमेदवारांनी व्यूहरचना आखली आहे. शनिवारी दिवसभरासह मध्यरात्रीपर्यत गुप्त प्रचाराचे खलबते सुऊच राहणार आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थिक उलाढाल आणि जेवणावळी होणार आहेत.
एक-एक मतासाठी ताकद पणाला
राजाराम कारखाना निवडणुकीसाठी चुरशीची लढत होत असल्यामुळे एक एक मत महत्वाचे ठरले आहे. उदेवारांपेक्षा नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरल्यामुळे संपूर्ण राज्याचे कोल्हापुरातील राजकीय घडामोडींकडे लक्ष आहे. कार्यकर्त्यांकडून पै-पाहुणे, मित्र मंडळीकडे जाऊन आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचा आग्रह केला जात आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ या आवेशातून दोन्ही आघाड्यांचे नेते, उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते ताकदीने प्रयत्न करत आहेत.
निवडणुकीकडे राज्याचे लक्ष
जिह्यातील एक साखर कारखान्याची ही निवडणूक होत असली तरी राज्याच्या राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष आहे. ही निवडणूक म्हणजे महाडिकांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. कोल्हापूर जिह्यात सहकार क्षेत्रातील अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राजाराम कारखान्यावर पुन्हा आपली सत्ता आणण्यासाठी महाडिक गटाने ताकद पणाला लावली आहे. तर या कारखान्यावर आपले वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्याकडून गेल्या पाच वर्षांपासून सुक्ष्म नियोजन सुरू आहे. या निवडणुकीच्या निकालातून जिह्यात एका नवीन राजकीय समिकरणास सुऊवात होणार आहे.
सोशल मिडियावरील प्रचाराला वेग
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच अनेक उमेदवारांनी जाहीर प्रचाराबरोबरच व्हॉटस् अॅप, फेसबुक, मेसेज, मोबाईल टिझर आदी सोशल मिडियाद्वारे प्रचार सुऊ केला आहे. जाहीर प्रचार बंद झाल्यानंतर सोशल मिडियावरील प्रचाराला वेग आला आहे. सभासदांना उमेदवाराचा फोटो आणि निवडणुकीचे चिन्ह पाठवून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
सभासदांची खूनगाठ पक्की……!
राजाराम कारखान्याची ही निवडणूक असली तरी कोरोना महामारी, महापूर आदी अडचणीच्या काळात कोणता नेता आमच्या मदतीसाठी धावून आला ? कोणी मदत केली ? कोणी जीवदान दिले ? आपला जीव धोक्यात घालून कोणी काम केले ? विकासकामांसाठी कोणता नेता आग्रही असतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ पोपटपंची करून मतांचे दान कोण मागत आहे ? याचा उहापोह सभासदांमध्ये सुऊ आहे. दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप ऐकण्याऐवजी कोणता नेता खरोखरच ऊसाला अधिकाधिक दर देऊ शकतो, कारखाना पारंपारिकतेकडून प्रगतीच्या वाटेवर कोण घेऊन जाऊ शकतो ? त्यांनाच मतदान करण्याची खुनगाठ सभासदांनी मनामध्ये बांधली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाटेवर स्वार होऊन मतदान मागणाऱ्यांना सभासदांचा कौल मिळणार की थेट जनतेशी नाळ जुळलेल्यांच्या झोळीत दान पडणार ? हे 25 एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे.









