बेपत्ता असल्याची नोंदविली तक्रार
वृत्तसंस्था/ त्रिशूर
वरिष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपी हे मागील काही काळापासून स्वत:चा मतदारसंघ आणि जिल्ह्यांच्या लोकांसाठी उपलब्ध नाहीत असा दावा करत केरळ स्टुडंट युनियनच्या एका नेत्याने रविवारी पोलीस स्थानकात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली आहे. केएसयू ही काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना आहे.
त्रिशूरचे खासदार गोपी हे मागील तीन महिन्यांपासून स्वत:च्या मतदारसंघात आलेले नाहीत. तसेच अलिकडेच छत्तीसगडमध्ये केरळच्या दोन कॅथोलिक नन्सना झालेल्या अटकेप्रकरणी शब्दही त्यांनी उच्चारलेला नाही. गोपी यांनी मागील लोकसभा निवडणुकीत पूर्णपणे ख्रिश्चन मतपेढीवर लक्ष केंद्रीत केले होते आणि समुदायाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी एका चर्चला सोन्याचा मुकूट प्रदान केला होता, परंतु भाजपशासित राज्यात नन्सना अपमानित करण्यात आल्यावर त्यांनी मौन बाळगल्याचा आरोप केएसयू नेते गोकुल गुरुवायूर यांनी केला आहे.
त्रिशूर पालिकेच्या अंतर्गत कार्यान्वित एका महत्त्वपूर्ण केंद्र सरकारच्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी अधिकाऱ्यांनी गोपी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो अयशस्वी ठरला. केंद्रीय मंत्री गोपी हे केवळ मतदारसंघातील लोकांसाठी नव्हे तर राज्यातील नेत्यांच्याही संपर्कात नाहीत असा दावा केएसयू नेत्याने केला आहे.









