किरण रिजिजूंनी केले लक्ष्य : जॉर्ज सोरोसचा केला उल्लेख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर रविवारी जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी काही बोलल्यास काँग्रेसचे खासदारच धास्तावून जातात. राहुल गांधी काहीतरी बडबड करतील आणि याचा फटका पक्षाला बसेल असे अनेक काँग्रेस खासदारांचेच मानणे आहे. राहुल गांधी अत्यंत विघातक मार्गावर जात आहेत. जॉर्ज सोरोस भारत सरकारला अस्थिर करण्यासाठी एक ट्रिलियन डॉलर्स इतकी रक्कम राखीव ठेवून असल्याचे सांगत आहे. कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि अनेक डाव्या संघटनांमधील भारतविरोधी घटक देशाविरोधात काम करण्याचा कट रचत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस या देशविरोधी घटकांसोबत मिळुन काम करत असून देशाला कमकुवत करू पाहत आहेत. हा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे, परंतु कुणीच देशाला अस्थिर करू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित असल्याचे उद्गार रिजिजू यांनी काढले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंभीर गुन्ह्यांसंबंधी मंत्र्यांना पदावरून हटविण्याच्या विधेयकावर ठाम भूमिका घेत पंतप्रधानपदाला यातून वगळण्याची शिफारसही नाकारली. पंतप्रधान देखील एक नागरिक आहेत आणि त्यांना विशेष सुरक्षा मिळू नये असे मोदींचे मानणे आहे. बहुतांश मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचे आहेत. जर त्यांनी काही चुकीचे केले तर त्यांना स्वत:चे पद सोडावे लागेल. नैतिकतेचा काही अर्थ असावा. विरोधी पक्षाने नैतिकता केंद्रस्थानी ठेवली असती तर त्यांनी या विधेयकाचे स्वागत केले असते असे वक्तव्य रिजिजू यांनी केले.
नुकसान विरोधी पक्षाचेच
संसदेचे कामकाज न चालल्यास नुकसान विरोधी पक्षाचेच आहे. सरकार देशहितात विधेयके संमत करविणार आहे. काँग्रेसला संसदीय चर्चेत कुठलाच रस नाही. ते संसदेत चर्चा करण्यावर विश्वास ठेवत नाहीत. कामकाज चालत नसल्याने स्वत:च्या मतदारसंघाच्या समस्या मांडता येत नसल्याची व्यथा काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या अनेक खासदारांनी माझ्यासमोर मांडली. विधेयके विनाचर्चा संमत होणे योग्य नाही. आम्ही चर्चेवर विश्वास ठेवणारे आहोत असे रिजिजू यांनी म्हटले आहे.
देशविरोधी शक्तींशी काँग्रेसची हातमिळवणी
निवडणुकीत विजय न मिळाल्यास काँग्रेस भारतविरोधी शक्तींशी मिळून सरकार आणि संस्थांवर हल्ले सुरू करतो. न्यायपालिका आणि निवडणूक आयोग विकला गेल्याचे काँग्रेस वारंवार म्हणत आहे. देश आणि सरकारची विश्वसनीयता कमकुव करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. डाव्या विचारसरणीच्या मानसिकतेसोबत काँग्रेस हे काम करत आहे. राहुल गांधी यांनी अत्यंत धोकादायक मार्ग निवडला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे.
मूलभूत कर्तव्याचाही राहुल यांना विसर
राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत आणि मी त्यांच्यावर टीका करू इच्छित नाही. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना चोर संबोधिल्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले होते. राहुल गांधी यांनी राफेल लढाऊ विमानाविषयी खोटे दावे केले होते. तसेच चीनने भारताच्या भूभागावर कब्जा केल्याचे वक्तव्य काँग्रेस नेत्याने केले होते. राहुल गांधी यांनी एका भारतीयाप्रमाणे बोलण्याची गरज आहे. मी राहुल गांधी यांना सुधारू शकत नाही. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत असायला हवा. परंतु राहुल गांधी हे मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावणे राहिले दूरच ते विरोधी पक्षाचे मूलभूत कर्तव्यही बजावत नसल्याची टीका रिजिजू यांनी केली आहे.








