भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे मत, 1975ची आणीबाणी लोक विसरलेले नाहीत
प्रतिनिधी/ पणजी
यापूर्वी 1975 मध्ये देशात आणीबाणी लादून काँग्रेसने लोकशाहीचा जो खून केला होता त्याला तोड नाही. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याबाबतीत घडलेल्या प्रकारानंतर काँग्रेसला इतरांवर आरोप करण्याचा अधिकार राहिलेला नाही, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केले आहे.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस दामू नाईक आणि उत्तर गोवा समन्वयक सिद्धार्थ कुंकळकर यांचीही उपस्थिती होती.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली व नंतर त्यांची खासदारकी रद्द होण्यापर्यंतच्या घटनांवरून देशभरात मोठी चर्चा रंगली. भाजपने लोकशाहीचा खून केला, यासारखे असंख्य आरोप करण्यात आले. मात्र त्यात तथ्य नाही. लोकशाहीचा खरा खून काँग्रेसनेच केला आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने अपात्र ठरविले होते. त्यानंतर 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लावण्यात आली. लोकांचे मतस्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. अनेक नेते वक्त्यांनी कैदेत टाकण्यात आले. खरे तर काँग्रेसने न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करायला हवा होता. परंतु त्यांनी लोकशाहीला डाग लावणारे कृत्य केले. असा इतिहास असताना आता काँग्रेसला भाजवर आरोप करण्याचा अधिकार राहिलेला नाही, असे तानावडे म्हणाले.
खरे तर काँग्रेसने आता विचार करण्याची गरज आहे. राहुल गांधी हे सराईत टीकाकार आहेत. हल्लीच त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रा केलेली असली तरी त्यांची मानसिकता ‘भारत तोडो’ ची आहे, असे तानावडे म्हणाले. आता त्यांना झालेली शिक्षा मान्य नसेल तर त्यांनी उच्च न्यायालयात तिला आव्हान दिले पाहिजे. परंतु तसे काहीच न करता ते केवळ भाजपवर आरोप करत सुटले आहेत.
राहुल यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप केलेले आहेत. त्यातून त्यांच्यावर मानहानीचे अनेक खटलेही दाखल झाले आहेत. 2014 मध्ये महाराष्ट्रात भिवंडी येथे पेलेल्या भाषणादरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येत संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 2016 मध्ये गोहत्ती आसाम येथेही संघावर गंभीर आरोप केला होता. 2018 मध्ये रांची झारखंड येथे बोलताना त्यांनी मोदी यांना चोर म्हटले होते. त्या प्रकरणी त्यांच्यावर 20 कोटींचा मानहानी खटला दाखल करण्यात आला आहे. 2018 मध्येच शिवडी येथे गौरी लंकेश यांच्या हत्येत संघाचा सहभाग असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पाटणा बिहार येथे केलेल्या भाषणात त्यांनी मोदी आडनावाचे सर्वजण चोर असल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणी सुशील मोदी यांनी त्यांच्या विरोधात मानहानी खटला दाखल केला होता, अशी माहिती तानावडे यांनी दिली.
त्याशिवाय राहुल यांनी पंतप्रधानांवर चौकीदार चोर है, हिटलर, जेबकतरा, भोंपू, जवानांच्या त्यागाची दलाली करणारे, अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर टीका केली होती. त्याशिवाय त्यांची बहीण प्रियंका यांनी पंतप्रधानांना दुर्योधनसुद्धा म्हटले होते, असे तानावडे म्हणाले.
आता राहुल यांना खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले असले तरी ते काही देशातील एकमेव उदाहरण नाही. यापूर्वी झारखंडचे आमदार कमल किशोर भगत (खुनाचा प्रयत्न), इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हलवनकर (वीज चोरी प्रकरण), देवळाली येथील शिवसेना आमदार बबनराव घोलप (बेनामी संपत्ती), झारखंड पार्टी आमदार इनोस एक्का (जन्मठेप), बिजावर मध्यप्रदेशच्या आमदार आशाराणी (मोलकरणीस आत्महत्येस प्रवृत्त करणे), उत्तर प्रदेशचे खासदार रशीद मसूद, बिहारचे खासदार लालूप्रसाद यादव (चारा घोटाळा), जहानाबाद बिहारचे खासदार जगदीश शर्मा (चारा घोटाळा), तामीळनाडू डीएमकेचे खासदार टीएम सेल्वानापटटी् (स्मशानभूमी शेड बांधकाम घोटाळा), तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता (बेनामी मालमत्ता) यासारख्या असंख्य नेत्यांना अटक होऊन नंतर अपात्र ठरविण्यात आले होते, अशी माहिती तानावडे यांनी दिली.









