गृहलक्ष्मी योजनेचा थाटात शुभारंभ : बेळगाव जिल्ह्यासाठी 198 कोटीचा निधी
बेळगाव : काँग्रेस सरकार हे गरिबांचे सरकार आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी जाहीर केलेल्या पाचही गॅरंटी योजना पूर्ण करणार आहे. आता गृहलक्ष्मी ही महत्त्वाकांक्षी चौथी योजना पूर्ण झाली असून महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे. बेळगाव जिल्ह्यासाठी 198 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज केलेल्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे, असे आमदार राजू सेठ यांनी सांगितले. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने गरिबांसाठीच आजपर्यंत काम केले आहे. यापुढेही गरिबांसाठीच हे सरकार काम करणार आहे. भारताला एकसंघ ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. युवकांना काम देणे याला आम्ही प्राधान्य देणार आहे. केवळ बोलून देश पहिल्या क्रमांकावर येणार नाही तर त्यासाठी तळागाळातील जनतेसाठी निवडून आलेल्या सरकारने काम केले पाहिजे.
राज्यातील जनतेने काँग्रेसला बहुमत दिले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वाटचाल सुरू आहे. महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महिलांसाठी भरघोस अशी मदत जाहीर केली आहे. आता महिलांना यापुढे आपल्या पतीकडे किंवा इतरांकडे पैशांसाठी हात पसरावे लागणार नाहीत. मात्र आलेले पैसे हे आपल्या भविष्यासाठी राखून ठेवावेत. कोरोनाकाळात जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली त्याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी आणि प्रत्येकाने पैसा जपून वापरावा, असे देखील त्यांनी सांगितले. म्हैसूर येथे गृहलक्ष्मी योजनेचे उद्घाटन झाल्यानंतर लागलीच रोपट्याला पाणी घालून बेळगाव येथेही योजनेला चालना देण्यात आली. रांगोळी स्पर्धेमधील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, मनपा उपायुक्त रेश्मा तालिकोटी, भाग्यश्री हुग्गी, नगरसेवक शाहीदखान पठाण, नगरसेविका अफरोज मुल्ला यांच्यासह अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गृहलक्ष्मी कार्यक्रमानिमित्त 13 हजार अल्पोपाहार पाकिटांचे वाटप
राज्य सरकारच्या गॅरंटी योजनेतील गृहलक्ष्मी योजनेचे उद्घाटन बुधवारी झाले. बेळगाव येथील 58 वॉर्डांमध्येही यानिमित्त कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला आलेल्या महिलांना तसेच नागरिकांना 13 हजार अल्पोपाहार पाकिटांचे वितरण करण्यात आले. महापालिकेच्या माध्यमातूनच याचे वितरण करण्यात आले असून महापालिकेवर अतिरिक्त ताण पडला आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये मंडप घालून त्याठिकाणी स्क्रीन लावून म्हैसूर येथील कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले. याचवेळी त्याठिकाणीही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गेल्या आठ दिवसांपासून जनजागृती करण्यात आली होती. महिलांनी उपस्थित रहावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
स्वतंत्रपणेही व्यवस्था
महिलांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली. 13 हजार पाकिटांचे वितरण करून काही ठिकाणी स्वतंत्रपणे अल्पोपाहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती. तरीदेखील काही जणांना अल्पोपाहार मिळाला नाही, अशा तक्रारी वाढल्या होत्या. महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.









