काँग्रेस 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यग्र
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीवरून चकित करणारे वक्तव्य केले आहे. काँग्रेस पक्षाला विरोधकांच्या एकतेशी कुठलेच देणेघेणे नाही. सध्या ‘इंडिया’वरून कुठलेच काम होत नाही. राष्ट्रीय पातळीवर आम्ही सर्वांना एकत्र आणून वाटचाल करतो. काँग्रेस मात्र 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये व्यग्र आहे. काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडीबद्दल कुठलीच चिंता नसल्याचे म्हणत नितीश कुमार यांनी एकप्रकारे नाराजीचा सूर काढला आहे. इंडिया आघाडी स्थापन झाली आहे, परंतु काँग्रेस पक्षाला यात फारसा रस नाही. सध्या 5 राज्यांमध्ये निवडणुका असून काँग्रेसचे पूर्ण लक्ष त्याकडेच आहे. सध्या आघाडीवरून कुठल्याही प्रकारची चर्चा होत नसून निवडणुकीनंतर सर्वांना पुन्हा बोलाविले जाणार असल्याचे नितीश यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारला स्वातंत्र्याशी कुठलेच देणेघेणे नाही. महात्मा गांधी यांचा विसर पडावा यासाठी केंद्र प्रयत्नशील आहे. याचमुळे आम्ही सर्व पक्षांसोबत चर्चा करत देशाला वाचविण्यासाठी एकजूट होण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे लोक हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करू पाहत आहेत. बिहारमध्ये पूर्वी मोठ्या घटना घडायच्या. परंतु 2007 पासून आम्ही नियंत्रण मिळविल्याचे नितीश यांनी भाकपकडून आयोजित सभेत म्हटले आहे. या सभेला लालूप्रसाद यादव हे अनुपस्थित होते हे विशेष.
भाकपशी जुने नाते
भाकपशी माझे जुने नाते आहे. 1987 मध्ये जेव्हा मी विधानसभा निवडणूक लढवत होतो, तेव्हा आमच्या क्षेत्रातील माकप आणि भाकपच्या सदस्यांनी मदत केली होती. याचमुळे आम्ही या दोन्ही पक्षांचा आदर करत राहू. सर्वांना एकजूट करत एका धोरणानुसार चालणे मुख्य उद्देश आहे असे नितीश कुमार म्हणाले.









