काँग्रेस पक्षाला येत्या निवडणुकांनंतर पंतप्रधानपदाची खुर्ची मिळवण्यात कोणताच रस नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे जेष्ठ नेते आणि अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी स्पष्ट केले आहे. काल बेंगळूर येथे झालेल्या भाजपविरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेसपक्षाची भुमिका स्पष्ट केली.
बंगळूरमध्ये काल भाजपविरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी देशभरातील 27 पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. या बैठकीला महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. आपल्या भाषणात बोलताना मलिकार्जून खरगे म्हणाले, “आम्हाला पंतप्रधानपदामध्ये कोणताही रस नाही. भारताची संकल्पना, संविधान, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचे रक्षण करण्यासाठी मित्रपक्षांच्या बरोबरीने भाजपशी लढण्यास तयार आहोत.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना खरगे म्हणाले की, “राज्य पातळीवर पक्षांमध्ये मतभेद असू शकतात, परंतु प्रत्येक सामान्य भारतीयाच्या फायद्यासाठी काँग्रेस सर्व मतभेद बाजूला ठेवण्यास तयार आहे. आमचा हेतू केवळ स्वतःसाठी सत्ता मिळवण्याचा नाही. सत्ता ही आपल्या संविधानाचे, लोकशाहीचे, धर्मनिरपेक्षतेचे आणि सामाजिक न्यायाचे रक्षण करण्यासाठी आहे.” असेही ते म्हणाले.
शेवटी बोलताना त्यांनी “नवीन युतीची रूपरेषा आखली जात असताना हा एक भक्कम आणि स्पष्ट संदेश होता कि, काँग्रेसला केवळ भारतातील मोठा पक्ष म्हणून नाही तर यूपीए काळात जशी सर्व पक्षांना एकत्र करून काम करणार पक्ष म्हणून ओळखला जाईल.” असेही ते म्हणाले.









