केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या तस्करांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. एकीकडे मोदी सरकार ‘नशामुक्त भारत’साठी शून्य सहिष्णुतेचे धोरण अवलंबित आहे, तर उत्तर भारतात जप्त करण्यात आलेल्या 5600 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या प्रकरणात काँग्रेसच्या एका नेत्याचा सहभाग अत्यंत धोकादायक आणि लाजिरवाणा असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या शासनात पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतातील युवांचे जे हाल झाले ते सर्वांनी पाहिले आहेत. मोदी सरकार युवांना क्रीडा, शिक्षण आणि नवोन्मेषाच्या दिशेने नेत आहे तर काँग्रेस त्यांना अमली पदार्थांच्या काळ्या जगता ढकलू पाहत असल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
काँग्रेस नेत्याने स्वत:च्या राजकीय प्रतिष्ठेद्वारे युवांना अमली पदार्थांच्या दरीत लोटण्याचे पाप केले आहे. परंतु मोदी सरकार अशा गुन्हेगारांना यशस्वी होऊ देणार नाही. आमचे सरकार अमली पदार्थांच्या तस्करांचे राजकीय पद किंवा प्रतिष्ठा न पाहता कारवाई करणार आहे असे शाह यांनी म्हटले आहे.
दिल्लीत हस्तगत करण्यात आलेल्या 5600 कोटी रुपयांच्या कोकेनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मुख्य आरोपी तुषार गोयल हा दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या आरटीआय शाखेचा अध्यक्ष राहिला आहे. आरोपीच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर देखील आरटीआय सेल चेअरमन, दिल्ली प्रदेश काँग्रेस असा उल्लेख आहे. आरोपीने डिक्की गोयल नावाने सोशल मीडियावर प्रोफाइल तयार केली आहे.
दिल्ली अमली पदार्थांचे हे मॉडेल तुषार गोयल चालवत होता. तुषारच्या मालकीच्या गोदामातूनच अमली पदार्थांची खेप जप्त करण्यात आली आहे.









