बिहारची विडीशी केली तुलना
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा काढून राजकीय वातावरण तयार केले होते, परतु आता त्याची हवा काँग्रेस नेतेच काढत आहेत. पंतप्रधान मोदींच्या आईविषयी आक्षेपार्ह टिप्पणीचा मुद्दा शांत झालेला नसताना काँग्रेसच्या केरळ शाखेने बिहारची तुलना विडीशी करून रालोआला मोठा राजकीय मुद्दा दिला आहे. केरळ काँग्रेसने सोशला मीडियावर केलेल्या पोस्टमुळे राजकीय वाद उभा ठाकला आहे. मोदी सरकारच्या जीएसटी सुधारावरून काँग्रेसने भाजपला लक्ष्य करण्यासाठी बिहारची तुलना विडीशी केली. यामुळे ही पोस्ट आता काँग्रेससाठी राजकीय टेन्शनचे कारण ठरली आहे.
केरळ काँग्रेसने ही पोस्ट हटविली असली तरीही भाजप-संजदने यावरून काँग्रेस विरोधात मोर्चा उघडला आहे. दोन्ही पक्षांनी काँग्रेसवर बिहारच्या लोकांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. परंतु या पोस्टमुळे वाद निर्माण झाल्यावर केरळ काँग्रेसने माफी मागितली आहे.
बिहारची तुलना विडीशी
काँग्रेसने जीएसटीतील सुधारांवरून भाजपला लक्ष्य करत एक चार्ट पोस्ट केला. काँग्रेसने ‘बिडी आणि बिहार, दोन्ही बी अक्षराने सुरू होतात’, आता याला पाप मानले जाऊ शकत नाही असे म्हटले होते. काँग्रेसकडुन हा ट्विट करण्यात येताच वाद निर्माण झाला. भाजप आणि संजदने याला बिहार आणि बिहारी लोकांचा अपमान ठरविले आहे. काँग्रेसने जो चार्ट पोस्ट केला होता, त्यात सिगारेटवरील कर 28 टक्क्यांवरून वाढवत 40 टक्के तर तंबाखूवरील कर 28 टक्क्यांवरून वाढवत 40 टक्के करण्यात आल्याचा उल्लेख आहे, तर विडीवरील 28 टक्के जीएसटी कमी करत 18 टक्के करण्यात आल्याचे नमूद आहे.
काँग्रेस लक्ष्य
काँग्रेसने केलेली पोस्ट ही बिहारचा अपमान करणारी आहे. प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवंगत मातेचा अपमान आणि आता पूर्ण बिहारचा अपमान काँग्रेसने केला असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी केली आहे. काँग्रेसच्या पोस्टमुळे बिहारचे लोक दुखावले गेले आहेत. काँग्रेसने बिहारची तुलना विडीशी करत स्वत:ची हीन मानसिकता दाखवून दिली असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी केला.









