सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपतर्फे आंदोलन : आमचा लढा यापुढेही कायम
बेळगाव : काँग्रेस सरकारच्या राजवटीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाळंतिणींची योग्य काळजी न घेतल्यामुळे त्यांचे मृत्यू होत आहेत. भरदिवसा मुलींना भोसकले जात आहे. त्यामुळे काँग्रेस सरकार महिलांच्या रक्षणास असमर्थ असून या बेजबाबदार सरकारला जागे करण्यासाठी आम्ही आंदोलन छेडले आहे. आमचा लढा यापुढेही कायम राहील, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी केले. बेळगावमध्ये सुवर्णसौध येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या व प्रामुख्याने बाळंतिणींच्या सुरक्षिततेबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपतर्फे मालिनी सिटी येथे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना विजयेंद्र बोलत होते.
अधिवेशन एखाद्या सहलीप्रमाणे
ते म्हणाले, सध्या सुरू असलेले अधिवेशन हे एखाद्या सहलीप्रमाणे सुरू आहे. मा. येडियुराप्पा यांनी लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी सुवर्ण विधानसौधचा प्रस्ताव मांडला होता पण, आज तेथे चर्चाच होत नाही. मुख्यमंत्री स्वत:च भ्रष्टाचारामध्ये अडकले आहेत. त्यांना लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. बळ्ळारी येथे दुर्लक्षामुळे बाळंतिणींचा मृत्यू झाला. बेळगावमध्ये सुद्धा याची पुनरावृत्ती झाली. परंतु आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांना पीडितांची भेट घेण्याएवढा वेळ नाही. बळ्ळारी येथे सत्कार स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री आले. परंतु त्यांनी हॉस्पिटलला भेट दिली नाही ते खेदजनक आहे.
कित्तूर चन्नम्मा यांची जन्मभूमी असलेल्या बेळगाव शहरात आज महिलांवर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. ज्या महिलांवर अन्याय झाला. त्यांच्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या सदस्या उभ्या राहिल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. बाळंतिणींसाठी येडियुराप्पा यांनी भाग्यलक्ष्मी योजना सुरू करून महिलांचे अश्रू पुसले. परंतु गॅरंटी योजनांच्या निधीसाठी सरकारने ही योजना बंद करून महिलांचा अपमान केला आहे. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असे विजयेंद्र म्हणाले.
मंजुळा यांनी बाळंतीण व बालमृत्यूंच्या घटनांसाठी जबाबदार असणाऱ्या सरकारची झोप उडवा, असे आवाहन केले. बाळंतिणींचे मृत्यू म्हणजे सरकारी प्रायोजित खूनच आहे. अशी टीका त्यांनी केली. आज राज्यात दोन हजारहून अधिक आरोग्य केंद्रे आहेत. कुटुंब कल्याण खाते आहे, जननी सुरक्षा योजना सुरू आहे, मोदी सरकारने त्यासाठी अनुदानही दिले आहे, परंतु राज्य सरकार मात्र महिलांची सुरक्षितता अबाधित ठेवण्याबाबत पूर्णपणे अपयशी ठरल्याचे त्या म्हणाल्या. राज्य महिला मोर्चाच्या भारती शेट्टी यांनी या सरकारला ब्रह्महत्येचा शाप लागला आहे. सरकारने आपले डोळे आणि कान मिटले असून हे मोठे रॅकेट आहे. याची चौकशी होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधानपरिषद सदस्यचे नेते चलवादी नारायण स्वामी, माजी खासदार मंगल अंगडी, महिला मोर्चाच्या रुपा नायक, शशिकला जोल्ले, डॉ. शोभा निसिमगौडर, शिल्पा, सुवर्णा, डॉ. सोनाली सरनोबत आदींसह अन्य सदस्या उपस्थित होत्या.









