25 नेत्यांचा भाजपप्रवेश, लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराला वेग
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थान काँग्रेसमधील 25 दिग्गज नेत्यांसमवेत राज्याच्या माजी मंत्र्याने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी या नेत्यांना भाजपचे सदस्यत्व प्रदान केले आहे. राज्याचे माजी मंत्री लालचंद कटारिया, राजेंद्र यादव, माजी आमदार रिछपाल मिर्धा, विजयपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, सुरेश चौधरी, विनोद पूनिया आणि रामपाल शर्मासमवेत अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
काँग्रेसमध्ये जनाधार असलेल्या नेत्यांना काडीचीही किंमत नाही. काँग्रेसमध्ये आता परस्परांना दुषणं देणारेच नेते राहिले आहेत. काँग्रेसने शेतकऱ्यांना कधीच काही दिले नाही. जाट समाजाला आरक्षण देण्याचे काम देखील भाजपनेच केले आहे. परसराम मदेरणा, महिपाल मदेरणा, नटवर सिंह यांच्यासमवेत अनेक दिग्गज नेत्यांसोबत काँग्रेसने काय केले हे पूर्ण राज्याला ठाऊक आहे. अशी टीका रिछपाल मिर्धा यांनी केली आहे.
काँग्रेसने अनेक मोठ्या नेत्यांना केवळ यूज अँड थ्रोच्या स्वरुपात वापरले आहे. आगामी काळात काँग्रेसचे आणखी अनेक नेते भाजपमध्ये सामील होणार आहेत. भाजपचा परिवार आता मजबूत होत चालला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विक्रमी विजय मिळविणार असल्याचा दावा भाजप नेत्या ज्योति मिर्धा यांनी केला आहे.









