40 टक्के कमिशन घेणाऱया मंत्र्याची हकालपट्टी करण्याची मागणी ; जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलग्यातील कंत्राटदाराने उडुपीत आत्महत्या केल्यानंतर काँग्रेसने भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहेत. जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून भाजप सरकारचा निषेध नोंदविला. याचबरोबर ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री के. ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन त्यानंतर पुतळय़ाचे दहन करून निषेध नोंदविण्यात आला.
हिंडलगा येथील संतोष के. पाटील (वय 35) राहणार समर्थनगर या कंत्राटदाराकडे मंत्री के. ईश्वरप्पा यांनी 40 टक्के कमिशन मागितले होते. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराने पंतप्रधानांकडे तक्रार केली होती. असे असतानाही भाजपने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. भाजपचे सर्वजण कमिशन घेत आहेत, असा आरोपदेखील यावेळी केला आहे. भाजपच्या या प्रकारामुळे निष्पाप कंत्राटदाराने आपले जीवन संपविल्याचा आरोपदेखील काँगेसने केला आहे.
के. ईश्वरप्पा यांच्यावर कारवाई करा
भाजप सरकारमधून के. ईश्वरप्पा यांना तातडीने काढून टाकावे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कमिशन मागितल्याचा उल्लेख संबंधित कंत्राटदारानेच केला आहे. त्यामुळे ईश्वरप्पा हे दोषी आहेत. तेव्हा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन
भाजप सरकार हे अपयशी आहे. भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता कंटाळली आहे, असा आरोपदेखील करण्यात आला. काँग्रेस कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार सतीश जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार अशोक पट्टण, राजू शेठ, रमेश कुडची, लक्ष्मण चिंगळे यांच्यासह काँग्रेसचे आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.









