कोल्हापूर प्रतिनिधी
कॉँग्रेसचा किल्ला हा अभेद्य असून कोणताही नेता फुटून भाजपमध्ये जाणार नाही, याची आपणास खात्री आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच वरीष्ठ नेत्यांनी एकत्रितपणे लढाई लढण्याचा निर्णय घेतला असून मविआच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यावर आम्ही भर देऊ असे प्रतिपादन विधानपरिषदेचे काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी केले. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते. यावेळी कॉँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील., आमदार जयश्री जाधव उपस्थीत होत्या.
आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. सामान्य लोकांचे प्रश्न रखडले असून बेभरवशाचा पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे. राज्यकर्त्यांचे याकडे लक्ष नसून मविआ एकत्रितपणे सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करु. मविआच्या प्रमुख नेत्यांची नुकतेच यासंदर्भात बैठक झाली. खराब रस्ते, नोकरभरती, शिक्षकभरती असे अनेक प्रश्न सुटलेले नसून विरोधी पक्ष म्हणून ते आम्ही ठामपणे मांडू.
विधीमंडळातील विरोधी पक्षनेते पदाबाबत बोलताना ते म्हणाले, मविआचे नेते शरद पवार यांनी यापूर्वीच ज्यांची संख्या जास्त त्याचा विरोधीपक्ष नेता असे स्पष्ट केले आहे. येत्या अधिवेशनापूर्वीच हा प्रश्न निकाली लागेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. महाविकास आघाडी एकसंघपणे राहणार असून आगामी निवडणूकाही एकत्रीतपणे लढू. वज्रमुठ सभेबाबत ते म्हणाले, सध्या पक्षीय स्तरावर सभा होत असून पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर मविआच्या वज्रमुठ सभाही घेतल्या जातील.









