4.82 लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप ः 2-जी ते कॉमनवेल्थ घोटाळय़ाचा उल्लेख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाने रविवारी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करत ‘काँग्रेस फाईल्स’ नावाची मालिका सुरू केली. या व्हिडिओ सीरिजमध्ये काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पहिल्या मालिकेत भाजपने काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या कथित घोटाळय़ांचा उल्लेख केला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात 4.82 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचाराचा हा आकडा इतका मोठा आहे की जीभही अडखळते, असे व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
काँग्रेस आणि भाजपमध्ये सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ युद्ध सुरू झाले आहे. काँग्रेस एकीकडे अदानी प्रकरण आणि राहुल यांच्या सदस्यत्वाबाबत भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे, भाजपने सोशल मीडियावर घोटाळे आणि भ्रष्टाचाराबाबत ‘काँग्रेस फाईल्स’ नावाची व्हिडिओ सीरिज सुरू केली आहे. भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करत ‘काँग्रेसच्या राजवटीत भ्रष्टाचार आणि घोटाळे कसे झाले ते पहा…’ अशी टिप्पणी केली आहे. व्हिडीओमध्ये काँग्रेसने जनतेच्या कष्टाने कमावलेल्या कोटय़वधी रुपयांची लूट केल्याचे म्हटले आहे. यामध्ये कोळशापासून टू-जी आणि कॉमनवेल्थ घोटाळय़ाचा उल्लेख करण्यात आला आहे. या निधीतून सुरक्षेपासून देशाच्या प्रगतीपर्यंत अनेक कामे करता आली असती, असे व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
तीन मिनिटांच्या या व्हिडिओची सुरुवात ‘काँग्रेस’चा अर्थ सांगून होते. त्यानुसार ‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’ असे संबोधत सदर व्हिडिओमध्ये निवेदकांनी काँग्रेसच्या 70 वर्षांच्या कारकिर्दीतील घोटाळय़ांचा उल्लेख केला आहे. त्यात कोळसा घोटाळा, टू-जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल घोटाळा यांचा उल्लेख आहे. या चित्रफितीचा शेवटही उत्कंठावर्धक असून ‘ही फक्त काँग्रेसच्या घोटाळय़ांची एक झलक आहे, चित्र अजून बाकी आहे’ असे नमूद केल्याने आता सर्वांनाच पुढील व्हिडिओची प्रतीक्षा आहे.
भाजपने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसच्या 70 वर्षांच्या राजवटीत 4.82 लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचे सांगण्यात आले आहे. या पैशाचा योग्य वापर केला असता तर या रकमेतून 24 आयएनएस विक्रांत बनवता आले असते, 300 राफेल विमाने खरेदी करता आली असती आणि 1000 मिशन मंगल पूर्ण करता आले असते, असेही नमूद केले आहे.
काँग्रेसची ‘डेमोक्रसी डिसक्वालिफाईड’ मोहीम
यापूर्वी काँग्रेसनेही अदानी मुद्दय़ावरून भाजपवर हल्लाबोल करत ‘हम अदानी के है कौन’ या मोहिमेंतर्गत अनेक प्रश्न मांडले होते. त्याला ‘डेमोक्रसी डिसक्वालिफाईड’ असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत ए. एम. सिंघवी, जितेंद्र सिंह, शक्ती सिंह गोहिल, अलका लांबा, राजीव शुक्ला हे व्हिडिओच्या माध्यमातून मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित करताना दिसले होते.









