वृत्तसंस्था /नवी दिल्ली
द्रमुक पक्षाने सनातन, अर्थात हिंदू धर्माविरोधात प्रक्षोभक विधानांची माळ लावल्याने ‘इंडी’ आघाडीतील काँग्रेससह अनेक पक्षांची कोंडी झाली आहे. काँग्रेसने हे द्रमुक नेत्यांचे व्यक्तीगत विधान असल्याचे स्पष्ट करत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला असला तरी द्रमुक हा विरोधी आघाडीतला महत्वाचा पक्ष असल्याने त्याच्या नेत्यांनी केलेल्या विधानांची धग काँगेसपर्यंतही पोहचली आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या धोरणाला काँग्रेसने ‘मवाळ हिंदुत्वा’च्या माध्यमातून विरोध करण्याची योजना आखली आहे. भाजपचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही, असे विधान नुकतेच राहुल गांधी यांनी देशात आणि विदेशातही केले आहे. मात्र, काँग्रेसचा मुख्य मित्रपक्ष असणाऱ्या द्रमुकने सरळ सरळ हिंदू धर्मावरच अश्लाघ्य भाषेत हल्ला चढविल्याने गांधींच्या मवाळ हिंदुत्व धोरणाचीही गोची झाली आहे, असे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच आता हा विषय संपवा अशी विनंती राहुल गांधींनी द्रमुकला केली असावी, असे बोलले जात आहे.
बॅनर्जीही नाराज
केवळ काँग्रेसच नव्हे तर ‘इंडी’ आघाडीतील तृणमूल काँग्रेस पक्षानेही द्रमुकच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. द्रमुकच्या या विधानांमुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना फटका बसू शकतो. कारण त्यांचा भर तेथील ‘भद्र’ लोकांच्या मतांवर आहे. एकंदर, विरोधी पक्षांची आघाडी अद्याप पूर्ण आकाराला येण्याच्या आधीच तिच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसते असे तज्ञांचे म्हणणे आहे.









