तेलंगणासाठी ‘हमी योजना’ही जाहीर करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 16 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक बोलावली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोमवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना यासंबंधी माहिती दिली. मुख्य कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर रोजी विस्तारित काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार असून त्यात सर्व प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख उपस्थित राहतील, असे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. 17 सप्टेंबरच्या संध्याकाळी हैदराबादजवळ एक रॅली काढण्यात येणार आहे. या मेळाव्यात पक्ष तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची ‘हमी योजना’ जाहीर करणार आहे.
20 ऑगस्ट रोजी काँग्रेसने आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली होती. या कार्यकारिणीमध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. खर्गे यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर 10 महिन्यांनी स्थापन झालेल्या ‘सीडब्ल्यूसी’मध्ये 39 नियमित सदस्य, 32 स्थायी निमंत्रित आणि 13 विशेष निमंत्रित आहेत. यामध्ये 15 महिला आणि सचिन पायलट आणि गौरव गोगोई यांसारख्या अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे.









