वृत्तसंस्था / गुवाहाटी
देशाचा विकास व्हावा, अशी काँग्रेसची इच्छाच नसून हा पक्ष प्रगती आणि शांतता यांचा सर्वात मोठा शत्रू आहे, अशी कठोर टीका आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक हा अराजकता आणि लोकशाही यांच्यातील संघर्ष आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
भारताची संस्कृती आणि परंपरा यांच्यासंबंधी काँग्रेसला घृणा आहे. सध्या भारताच्या संस्कृतीकडून सारे जग मार्गदर्शन घेत आहे. हा आपल्या संस्कृतीचा मोठा विजय आहे. अशा स्थितीत काँग्रेस या घडामोडींकडे पाठ फिरविण्यात धन्यता मानत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या दशकात भारताचे अमूलाग्र परिवर्तन झाले आहे. त्यामुळे भारतातील लोक त्यांच्यासमवेत आहेत. याचे विरोधकांनी अतीव दु:ख होत आहे. म्हणूनच ते विकासाच्या मार्गात अडथळे आणण्याचा शक्य तितका प्रयत्न करीत आहेत. मात्र, भारतातील सुजाण मतदार विरोधकांचे हे डावपेच ओळखून असून आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना ते धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राहुल गांधींमुळे काँग्रेसची हानी
राहुल गांधींमुळे काँग्रेसची हानी होत आहे. ते आसाममध्ये आले आणि त्यांनी या राज्यातील 90 टक्के काँग्रेस नष्ट केली. आता या राज्यात केवळ 10 टक्के काँग्रेस वाचली आहे. तीही येत्या लोकसभा निवडणुकीत लयाला जाईल. आता काँग्रेसच्या पिछेहाटीला कोणीही रोखू शकत नाहीत, असे प्रतिपादन त्यांनी केले.









