राहुल गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधी घोषणेवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलावण्याची मागणी केली आहे. संसदेत होणाऱ्या चर्चेतून देशातील जनतेला भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात केलेल्या पराक्रमाची माहिती समजेल असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. चार दिवस चाललेल्या लष्करी कारवाईत भारताने पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. सरकारच्या या लष्करी कारवाईचे देशातील प्रत्येक नागरिकाने कौतुक केले. विरोधकांनीही मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला होता. आता याच मुद्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. ‘संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलावण्यात यावे, अशी विरोधी पक्षांची एकमताने केलेली विनंती मी पुन्हा एकदा मांडतो’, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.









