कळंगुट ओडीपी दबावाखाली तयार करण्यात आल्याचा दावा
प्रतिनिधी/ पणजी
पीडीए कार्यालयाचा गैरवापर आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणून भाजप सरकारने कळंगुट येथील जमिनीचे झोन बदलले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे पीडीए रद्द करावी, अशी मागणी पक्षाचे नेते एल्विस गोम्स यांनी केली आहे.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वीरेन शिरोडकर, योगेश नागवेकर, मेलविन फर्नांडिस आणि लॉरेन्सो सिल्वेरा यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना गोम्स यांनी, भाजपने 12 वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंतचा सर्वात मोठा जमीन घोटाळा केला असून कांदोळी, कळंगुट, पर्रा आणि नागवे येथील 17 लाख चौरस मीटर जमीन रूपांतरित करण्यात आली आहे, असा दावा केला. या घोटाळ्यात सत्ताधारी आमदार आणि मंत्रीही गुंतले असून त्यांच्या मर्जीनुसार झोन बदलण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. म्हणूनच पीडीए रद्द केले पाहिजेत, असे ते म्हणाले.
रूपांतरित करण्यात आलेल्या 17 लाख चौरस मीटर जमिनीत कृषी, उतार असलेली जमीन तसेच खारफुटी क्षेत्राचा समावेश आहे. मात्र, सरकारने कारवाईसाठी काहीही केलेले नाही, असे ते म्हणाले.
जमीन घोटाळ्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांच्यासह ‘तडजोड सरकार’ जबाबदार आहेत, असे सांगताना या सरकारमध्ये सुरू असलेली ‘सूटकेस संस्कृती’ बंद झाली पाहिजे. तसेच गोव्याच्या हितासाठी पीडीए रद्द केली पाहिजे, असे गोम्स शेवटी म्हणाले.









