विश्वसमुदायासमोर पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी भारताने सज्ज केलेल्या योजनेचा शुभारंभ लवकरच होत आहे. भारताच्या वतीने जगातील सर्व प्रमुख देशांमध्ये लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांची प्रतिनिधीमंडळे पाठविली जाणार आहेत. प्रत्येक पक्षाने आपल्या सदस्यांची निवड केली आहे. याही संदर्भात काँग्रेसमधील गोंधळ उघड झाला आहे. काँग्रेसचे थिरुवनंतपुरमचे खासदार आणि ज्येष्ठ नेते शशी थरुर यांची निवड केंद्र सरकारने अमेरिकेला पाठविल्या जाणाऱ्या प्रतिनिधीमंडळाचे नेते म्हणून केली आहे. तथापि, काँग्रेसने ज्या चार खासदारांची सूची प्रसिद्ध केली आहे, त्या खासदारांमध्ये थरुर यांचे नावही नाही.
त्यामुळे शशी थरुर हे अमेरिकेला जाणाऱ्या प्रतिनिधीमंडळात काँग्रेसचे सदस्य म्हणून असणार की भारत सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून असणार, हे स्पष्ट झालेले नाही. अलिकडच्या काळात थरुर यांनी सिंदूर अभियानात केंद्र सरकारची प्रशंसा केली आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानला अत्यंत योग्य प्रकारे धडा शिकविला आहे, असे विधान त्यांनी अनेकवेळा केले. त्यामुळे काँग्रेसश्रेष्ठींचा राग त्यांना ओढवून घ्यावा लागला आहे. विशेषत: राहुल गांधी त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. लक्ष्मणरेषा ओलांडू नका, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. कदाचित यामुळेच त्यांचे नाव काँग्रेसच्या सूचीत नसावे, अशी चर्चा आहे. तथापि, केंद्र सरकारकडून त्यांची निवड झाल्याने त्यांचा अमेरिका दौरा निश्चित होणार आहे. मात्र, काँग्रेसमधील गोंधळ त्यामुळे स्पष्टपणे समोर आला आहे.









