वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशातील बंडखोरीमुळे काँग्रेस नेतृत्वाला झुकावे लागले आहे. पक्षाने राज्यातील 4 मतदारसंघांमधील उमेदवार बदलले आहेत. या मतदारसंघांमध्ये पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांना मोठा विरोध झाला होता. काँग्रेसकडून आता नव्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहेत. तसेच आणखी काही मतदारसंघांमधील उमेदवार काँग्रेसकडून बदलले जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने सुमावली मतदारसंघात कुलदीप सिकरवार यांच्याजागी अजब सिंह कुशवाह यांना उमेदवारी दिली आहे. पिपरिया मतदारसंघात गुरुचरण खरे यांच्याऐवजी विरेंद्र वेलवंशी हे काँग्रेसचे उमेदवार असतील. बडनगर येथे राजेंद्र सिंह सोलंकी यांच्या जागी मुरली मोरवाल हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. जौरा मतदारसंघात हिम्मत श्रीमल यांना दिलेली उमेदवारी मागे घेत पक्षाने विरेंद्र सिंह सोलंकी यांना तिकीट दिले आहे.
सुमावली मतदारसंघात काँग्रेसला सर्वाधिक बंडखोरीला सामोरे जावे लागले होते. अजब सिंह कुशवाह यांनी शर्ट फाडून घेत काँग्रेसला रामराम ठोकला होता. यानंतर ते बसपमध्ये सामील झाले आहेत. अजब सिंह कुशवाह हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस नेतृत्वाला मोठा धक्का बसला होता. अशा स्थितीत पक्षाने आता चार दिवसांपूर्वीच बसपमध्ये दाखल झालेल्या अजब सिंह कुशवाह यांना उमेदवारी दिली आहे.
मुरली मोरवाल यांना पुन्हा उमेदवारी
बडनगरचे आमदार मुरली मोरवाल यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. त्यांच्या मुलावर बलात्काराचा आरोप झाला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यामुळे काँग्रेसची मोठी फजिती झाली आहे. मुरली मोरवाला यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली होती. याचमुळे मोरवाल यांना तिकीट नाकारण्यात आल्याचे मानले गेले होते. परंतु मोरवाल यांच्या समर्थकांच्या विरोधामुळे पक्ष बॅकफूटवर गेला आहे. काँग्रेसला पुन्हा मुरली मोरवाल यांनाच बडनगर येथील उमेदवारी द्यावी लागली आहे.
काँग्रेसचा यूटर्न
अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवार घोषित झाल्यावर तीव्र विरोध सुरू झाला होता. बंडखोरीची धग भोपाळमध्ये कमलनाथ यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचली होती. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांचे समर्थक मतदारसंघांमध्ये घेरू लागले होते. अशा स्थितीत काँग्रेससमोर मोठी अडचण उभी राहिली होती. वाढत्या विरोधामुळे काँग्रेसने यूटर्न घेत उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.









