जनतेच्या तक्रारींचे निराकरण करून बेळगावच्या विकासाचे आश्वासन : पाठिंब्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार असिफ (राजू) सेठ यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराला जोर देताना मतदारांची भेट घेण्यावर भर दिला आहे. नुकतीच त्यांनी यमनापूर येथे जाऊन मतदारांची भेट घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या. निवडणुकीत आमदार म्हणून आपण निवडून आल्यास या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यमनापूर व परिसराच्या आणि बेळगावच्या विकासासाठी योग्य पावले उचलण्याविषयीही त्यांनी सांगितले. यमनापूरच्या जनतेने आपल्याला उत्स्फूर्त पाठिंबा देऊन आपल्यावर विश्वास व्यक्त केल्याचा दावा त्यांनी केला.
‘एम. एम. एक्स्टेंशन’ परिसरातील रहिवाशांबरोबर संवाद
याशिवाय असिफ (राजू) सेठ यांनी ‘एम. एम. एक्स्टेंशन’ परिसराला भेट देऊन तेथील रहिवाशांबरोबर संवाद साधला. यावेळी रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात त्यांचे स्वागत केले. त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावली. पक्षाने समोर आणलेल्या नवीन चेहऱ्याला भेटण्यासाठी खासकरून तऊण खूप उत्सुक दिसून आले. सेठ यांनी आश्वासन देताना सांगितले की, येथील रहिवाशांनी आपल्याला मतदान केल्यास त्यांच्या गरजा पूर्ण केल्या जातील आणि त्यांच्या तक्रारी सोडवल्या जातील. संपूर्ण शहरात विकासकामे केली जातील, असेही त्यांनी सांगितले.









