प्रतिनिधी / बेळगाव
उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार असिफ ऊर्फ राजू सेठ यांनी गुऊवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपले बंधू माजी आमदार फिरोज सेठ यांनी केलेल्या विकासकामाच्या जोरावरच आम्ही मतदारांकडे मत देण्याची विनंती करणार आहे. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता केवळ विकासासाठी आम्ही काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे राजू सेठ यांनी आपल्या काही मोजक्या समर्थकांसहच महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयात आपला अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार फिरोज सेठ, सतीश जारकीहोळी, एम. बी. शेख, अॅड. आर. पी. पाटील यांच्यासह काँग्रेसची काही नेतेमंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भ्रष्टाचारमुक्त विकास करणार आहे. कोणताही जाती भेद, भाषा भेद न करता आम्ही सर्वसामान्य जनतेची कामे करणार असून उत्तर मतदारसंघाचा संपूर्ण विकास साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी राजू सेठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेसच्या हायकमांडने माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्याचे निश्चितच सोने करीन. मतदारांना विश्वासात घेऊनच काम करीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.









