प्रतिनिधी/ मडगाव
काँग्रेस पक्षाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत असल्याने काँग्रेस पक्षात प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूने भाजपने आपला उमेदवार जाहीर करून प्रचाराचा एक टप्पा पूर्ण करण्याकडे वाटचाल केली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाचा उमेदवार आज रविवारी सायंकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता काँग्रेसच्या गोटातून व्यक्त केली जात आहे.
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी एक-दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर आपल्याला उमेदवारी मिळल्यास आपण नक्की विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.
काँग्रेस पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न करणारे गिरीश चोडणकर व संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जाणारे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. गिरीश चोडणकर यांनीही दिल्लीवरून उमेवारी जाहीर होण्यास विलंब लागत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
गिरीश चोडणकर यांनी मडकई, फेंडा व काणकोण मतदारसंघांचा दौरा करून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तर कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केपे व काणकोण मतदारसंघाचा दौरा केला आहे. उमेदवारी जाहीर झाली नसली तरी आम्ही काँग्रेस पक्षाचा प्रचार करीत असल्याचे दोघांनीही स्पष्ट केले आहे.
आपतर्फे जागृती
इंडिया आघाडीचा उमेदवार लवकरच जाहीर होईल असा विश्वास बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हियेगस यांनी व्यक्त करतानाच आपच्या कार्यकर्त्यांसह मडगाव शहरात जागृती करण्यावर भर दिला. उमेदवार जाहीर होण्याची वाट पाहण्यापेक्षा मतदारांमध्ये जागृती होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
काँग्रेस पक्षाचे एल्विस गोम्स म्हणाले की, काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर करणे आवश्यक होते. मात्र, काहीजण पक्षापेक्षा आपल्याला श्रेष्ठ समजत असल्याने अद्याप उमेदवार जाहीर करणे पक्षाला शक्य झालेले नाही.
20 दिवसांनीच विजय मिळविला होता
दक्षिण गोव्यात गेल्या निवडणुकीत अवघ्या 20 दिवसांत आपण काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक जिंकली होती, असा दावा खासदार सार्दिन यांनी पत्रकार परिषदेत केला. आपण चारवेळा दक्षिण गोव्यातून खासदार म्हणून निवडून आलो. ही आपली शेवटची निवडणूक असून आपण उमेदवारीसाठी दावा केला असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्यंतरी आपल्याला उमेदवारी नाकारून पक्षाने विधानसभेत प्रेक्षकांच्या गॅलरीसाठी आवाज काढणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून पक्षाचे तिकिट दिले व मतदारांनी त्यांचा पराभव केला होता असे खासदार सार्दिन यावेळी म्हणाले.
आपण कोणालाही फसविलेले नाही. तसेच आपली दारे लोकांसाठी सदैव खुली असतात. पक्षाने जर पुन्हा संधी दिली तर आपण नक्कीच दक्षिण गोव्यातून निवडून येऊ शकतो असे सार्दिन म्हणाले. भाजप ही जुमला पार्टी असून लोकांना केवळ खोटी आश्वासने देतात. खनिज व्यवसाय सुरू झालेला नाही. गोव्याचे मुख्यमंत्री आपले डोळे उघडत नाही. गोव्याच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. कर्ज काढून या ठिकाणी कार्यक्रम केले जात असल्याची टीका त्यांनी केली.
भाजपने गोव्याच्या समस्या सोडविल्या का ?
भाजप सरकारने येथील समस्या सोडविल्या का, असा सवालही सार्दिन यांनी उपस्थित केला. वास्कोत कोळसा प्रदूषण होत आहे. त्यावर उपाययोजना आखलेली नाही. रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण बंद केलेले नाही. पणजी स्मार्ट सिटीचे लोकांना त्रास होत आहे. व्यापारीवर्गाला फटका बसत आहे तरीसुद्धा मुख्यमंत्री अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जुने गोव्यातील बांधकाम अद्याप पाडलेले नाही. कारण ते भाजपशी संबंधित असलेल्या व्यक्तीचे आहे. त्यावर कारवाई करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. आपण लोकांना भेटत नाही असा आरोप मुख्यमंत्री करतात, मात्र, आपण सातत्याने लोकांमध्ये असतो असा दावा खासदार सार्दिन यांनी यावेळी केला.
केंद्रातील भाजप सरकारने भ्रष्टाचार कायदेशीर केला आहे. मात्र, विरोधकांना ईडी लावून सतावण्याचे काम केले आहे. काँग्रेसच्या आमदारांना ईडीची भीती दाखवून तसेच पैसे देऊन भाजपमध्ये प्रवेश दिला जातो असा आरोपही त्यांनी केला.
स्वार्थी पाद्री भाजपबरोबर असू शकतो
चुकून एखादा पाद्री स्वार्थी असल्यास तो भाजपबरोबर असू शकतो. अन्यथा इतर पाद्री नेहमीच हिंदू विरोधी असून ते भाजपच्या विरोधात असल्याचे विधानही खासदार सार्दिन यांनी यावेळी केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत काही पाद्री हे आप सोबत होते. ते आपल्या सोबत नव्हते, मात्र, ते हिंदुत्वाच्या विरोधात होते, असे सार्दिन म्हणाले.









