काँग्रेसकडून यतिंद्र सिद्धरामय्या तर भाजपकडून सी. टी. रवी यांना संधी
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेसने सात आणि भाजपने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या आणि विद्यमान मंत्री एन. एस. बोसराजू यांना तिकीट देण्यात आले आहे. तर या आश्चर्यकारक घडामोडी घडवून भाजपने माजी मंत्री सी. टी. रवी यांना संधी दिली आहे. याचबरोबर भाजपने विद्यमान विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद एन. रविकुमार आणि माजी आमदार, मराठा विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष एम. जी. मुळे यांना रिंगणात उतरविले आहे. दरम्यान, एका जागा मिळणाऱ्या निजदने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसकडून यतिंद्र सिद्धरामय्या, विद्यमान मंत्री एन. एस. बोसराजू, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव डॉ. के. गोविंदराजू, काँग्रेसचे कार्याध्यक्ष कारवारचे वसंतकुमार, जगदेश गुत्तेदार, माजी विधानपरिषद सदस्य ऐवान डिसोजा आणि शिमोग्याचे बिल्किस बानो यांना तिकीट देण्यात आले आहे. याचबरोबर जगदीश शेट्टर यांच्या विधानपरिषद सदस्य पदाच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेसाठी आगामी दिवसात पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठीही काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली असून युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बसनगौडा बादर्ली यांना संधी दिली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा मिळविल्याने त्या आधारावर 11 पैकी 7 जागा काँग्रेसला मिळणार आहेत. तर विधानसभेत 65 सदस्य असलेल्या भाजपचे विधानपरिषदेत तीन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. एक सदस्य जिंकण्यासाठी 19 मतांची आवश्यकता असल्याने काँग्रेसला सात, भाजपला तीन आणि निजदला एक जागा मिळणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. यावेळी विधानपरिषदेच्या निवडणुकीत मंड्याच्या खासदार सुमलता अंबरीश यांना तिकीट दिले जाणार असल्याची अफवा पसरली होती. लोकसभा निवडणुकीत निजदला मंड्या मतदारसंघ सोडून देणाऱ्या सुमलता यांना विधानपरिषदेवर निवडून आणले जाईल, अशी चर्चा भाजपच्या पक्ष कार्यालयात होती. पण आता भाजपने यादी जाहीर केली असून वक्कलिग समाजातील सी. टी. रवी, मागासवर्गीय समाजातील एन. रविकुमार आणि संघ परिवारातील एम. जी. मुळे यांना उमेदवारी दिली आहे.