अलका लांबांनी शेअर केला फोटो : भाजपकडून ‘समाचार’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उद्योगपती गौतम अदानी यांच्या समर्थनार्थ उतरलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी शरद पवारांना लोभी असे संबोधले. आज फक्त घाबरलेले आणि लोभी लोक आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान गात असल्याचे त्या म्हणाल्यह. अलका लांबा यांनी यासंदर्भात ट्विट करत शरद पवार यांचा गौतम अदानींसोबतचा फोटो शेअर केला आहे.
अलका लांबा यांनी शनिवारी शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा फोटो शेअर करत ट्विट केले होते. अलका लांबा यांच्या या वक्तव्यानंतर भाजपही रिंगणात उतरली आहे. त्यांच्या ट्विटवर भाजप नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बचाव केला आहे. राजकारण येते आणि जाते, परंतु येथे काँग्रेस नेत्याने शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबाबत केलेली टिप्पणी अपमानास्पद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी ‘हे काँग्रेसचे अधिकृत विधान आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप नेते गौरव भाटिया यांनी लांबा यांच्या वक्तव्यावर ‘काँग्रेस नेत्यांचे ट्विट आणि वक्तव्ये पक्षाची मानसिकता दर्शवतात’ असे स्पष्ट केले.
गौतम अदानी प्रकरणावर जेपीसीच्या विरोधकांच्या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. जेपीसीऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती या प्रकरणावर अधिक प्रभावी ठरेल, असे ते म्हणाले होते. पवारांच्या या विधानाला त्यांचा मोदी सरकारकडे असलेला कल जोडला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या असून अलका लांबा यांनी पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता.









