वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सहा उमेदवारांची घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथील काँग्रेसच्या मुख्यालयातून ही घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्सशी युती केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर शनिवारी उमेदवारांची पहिली सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशीही युती केली आहे. या युतीत कोणता पक्ष किती जागा लढविणार यासंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, नॅशनल कॉन्फरन्स हा सर्वाधिक जागा लढविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस नेमक्या किती जागा लढविणार हे निश्चित झालेले नसले तरी या पक्षाने शनिवारी सहा नावांची घोषणा केली आहे. युतीची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप सर्व जागांवर सहमती झालेली नाही. काही जागांसंबंधी वाद आहे, असे प्रतिपादन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. त्यामुळे अद्याप युतीचे स्वरुप स्पष्टपणे समोर आलेले नाही. काँग्रेसने आपले जुने ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना पक्षात परत आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. तथापि, आझाद यांनी यासंबंधी कोणताही निश्चित निर्णय घेतलेला नाही. या केंद्रशासित प्रदेशात 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.









