नकुलनाथ छिंदवाडाचे उमेदवार : वैभव गेहलोत जालोरमधून निवडणूक लढविणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी स्वत:च्या उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांची नावे सामील आहेत. गौरव गोगोई हे आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. तर मध्यप्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघात कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. नकुलनाथ यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याने कमलनाथ हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे.
भाजपमधून आलेले राहुल कस्वां यांना राजस्थानच्या चुरू तर अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना जालौर मतदारसंघात पक्षाने उमेदवारी दिली आहे. फूल सिंह बरैया हे मध्यप्रदेशच्या भिंड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार असतील. दुसऱ्या यादीतील 43 उमेदवारांपैकी 10 उमेदवार हे उच्चवर्णीय, 13 ओबीस, 10 अनुसूचित जातीशी संबंधित तर 9 जण हे अनुसूचित जमातीचे सदस्य आहेत. पक्षाने एक मुस्लीम उमेदवारही जाहीर केला असल्याची माहिती काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.
काँग्रेसने दुसऱ्या यादीत आसाममधील 12 मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर गुजरातमधील 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा पक्षाने केली आहे. काँग्रेसने मध्यप्रदेश अन् राजस्थानमधील प्रत्येकी 10 उमेदवार घोषित केले आहे. उत्तराखंडमधील 3 तर दीव आणि दमणच्या उमेदवाराचे नाव काँग्रेसने दुसऱ्या यादीद्वारे जाहीर केले आहे.
काँग्रेसने यापूर्वी 39 उमेदवारांची पहिली यादी जारी केली होती. यात राहुल गांधी, शशी थरूर, पे.सी. वेणुगोपाल समवेत दिग्गज नेत्यांची नावे सामील होती. राहुल गांधी हे वायनाड या केरळमधील मतदारसंघातूनच निवडणूक लढविणार आहेत.