कमलनाथ छिंदवाडा, भूपेश बघेल पाटणमधून रिंगणात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मध्यप्रदेशातील विधानसभेच्या 230 पैकी 144 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचवेळी, छत्तीसगडमधील 90 पैकी 30 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तेलंगणातील 119 जागांपैकी 55 जागांसाठी पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थान आणि मिझोराम विधानसभेचे उमेदवारही लवकरच जाहीर केले जाऊ शकतात.
तेलंगणामध्ये पक्षाने 46 टक्क्मयांहून अधिक जागांसाठी उमेदवार जाहीर केले. राज्यात विधानसभेच्या एकूण 119 जागा आहेत. 2013 मध्ये पक्षाने येथे 13 जागा जिंकल्या होत्या. मात्र, सध्या केवळ पाचच आमदार आहेत. पहिल्या यादीत पाचही विद्यमान आमदारांना तिकीट मिळाले आहे. त्यापैकी करीमनगर जिह्यातील मंथनी मतदारसंघातून दुडिला श्रीधर बाबू, मेंडक जिह्यातील संगारेड्डी विधानसभा मतदारसंघातून थुरूपू जग्गा रेड्डी, वारंगल जिह्यातील मुलुग राखीव जागेवरून दानसारी अनसूया सीताक्का हे पुन्हा लढणार आहेत. तसेच भट्टी विक्रमार्क मल्लू यांना खम्मम जिह्यातील मधीरा राखीव जागेवरून पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. त्याचबरोबर नालगोंडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उत्तम कुमार रेड्डी यांना नालगोंडा जिह्यातील हुजूर नगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी या जागेवरून विजय मिळवला होता. मात्र, ते खासदार झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ही जागा सत्ताधारी पक्ष टीआरएसकडे गेली. बीआरएसमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले मलकानगिरीचे आमदार हनुमंत राव मैनमपल्ली यांना पक्षाने येथून तिकीट दिले आहे. पक्षाने हनुमंत राव यांचा मुलगा डॉ. रोहित मैनामपल्ली यांना मेडक जिह्यातील मेडक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
छत्तीसगड : मुख्यमंत्र्यांसह 30 जणांची यादी
काँग्रेसने 90 सदस्यीय छत्तीसगड विधानसभेसाठी 30 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि उपमुख्यमंत्री टी. एस. सिंह देव यांचीही नावे आहेत. बघेल यांनी त्यांच्या पारंपरिक पाटण मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. येथे त्यांचा सामना भाजपचे उमेदवार आणि त्यांचे पुतणे विजय बघेल यांच्याशी होणार आहे. विजय सध्या भाजपचे खासदार आहेत. तसेच पक्षाने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव यांना अंबिकापूरमधून तिकीट दिले आहे. मंत्रिमंडळात समाविष्ट सर्व 13 मंत्र्यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. पॅबिनेट मंत्री आणि दुर्ग ग्रामीणचे आमदार ताम्रध्वज साहू पुन्हा या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत.
मध्यप्रदेश : कमलनाथ छिंदवाडामधून लढणार
काँग्रेसच्या पहिल्या यादीत मध्यप्रदेशात सर्वाधिक 144 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ पुन्हा एकदा छिंदवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राघोगडमधून आणखी एक माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा मुलगा जयवर्धन सिंह रिंगणात उतरणार आहेत. जयवर्धन सिंह हे कमलनाथ सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. दिग्विजय यांचे भाऊ लक्ष्मण सिंह हेही चचोडा मतदारसंघातून पुन्हा एकदा नशीब आजमावणार आहेत.









