पंतप्रधान मोदींकडून नव्या वक्फ कायद्याची पाठराखण
वृत्तसंस्था/ हिसार
हरियाणाच्या हिसार येथून अयोध्येसाठीच्या पहिल्या फ्लाइटला हिरवा झेंडा दाखविल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका जाहीर कार्यक्रमाला संबोधित केले. काँग्रेसने नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे संरक्षक राहिले. परंतु काँग्रेस नेहमीच राज्यघटनेचा भक्षक राहिला आहे. काँग्रेसने स्वत:च्या शासनकाळात गरीब, दलित, मुस्लिमांचे कल्याण केले नाही. 2013 मध्ये देखील वक्फ कायद्यात बदल करत काँग्रेसने तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेपेक्षा वरचढ ठरविला होता. तर भाजपने हा आता वक्फ बोर्ड कायद्यात बदल केला असल्याचे मोदींनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसला मुस्लिमांची खरोखरच चिंता वाटत असेल तर एखाद्या मुस्लिमाला काँग्रेसचा अध्यक्ष का केले जात नाही असा सवाल मोदींनी केला आहे.
वक्फ कायदा पूर्वी भू-माफियांसाठीच होता, आता नव्या कायद्यात कुणी आदिवासीची जमीन बळकावू शकणार नाही असे मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी सोमवारी अग्रसेन हासार विमानतळावरून हिसार-अयोध्या विमानाला हिरवा झेंडा दाखविला आणि हिसार विमानतळावर टर्मिनल 2 च्या कार्य शुभारंभ केला आहे.
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चुकीची वागणूक दिली होती. डॉ. आंबेडकर यांना काँग्रेसने दोन निवडणुकांमध्ये पराभूत करविले. डॉ. आंबेडकर यांच्या आठवणी मिटविण्याचा प्रयत्न देखील काँग्रेसने केला आहे. डॉ. आंबेडकर हे समानता आणू इच्छित होते, परंतु काँग्रेसने आता देशात व्होटबँकेचा व्हायरस फैलाविला असल्याचे म्हणत मोदींनी विरोधी पक्षाला लक्ष्य केले.
काँग्रेसमुळे मुस्लीम समाजाचे नुकसान
डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षण न देण्याची व्यवस्था केली होती. तर दुसरीकडे काँग्रेसच्या तुष्टीकरणामुळे मुस्लीम समुदायाचे नुकसान झाले आहे. काँग्रेसने काही कट्टरवाद्यांना खूश करण्यापोटी पूर्ण समुदायाचे नुकसना केले. स्वातंत्र्यानंतर 2013 पर्यंत वक्फचा कायदा लागू होता, परंतु निवडणूक जिंकण्यासाठी तुष्टीकरण आणि मतपेढीच्या राजकारणासाठी 2013 साली काँग्रेसने वक्फ कायद्यात दुरुस्ती केली होती. मतपेढीला खूश करण्यासाठी काँग्रेसने डॉ. आंबेडकर यांच्या राज्यघटनेला धक्का पोहोचविला. काँग्रेसने राज्यघटनेचा केवळ अपमान केला असल्याची टीका मोदींनी केली आहे.
काँग्रेसला दिले आव्हान
मतपेढीचे राजकारण करणाऱ्यांना जर मुस्लिमांची चिंता असेल तर मुस्लिमाला काँग्रेसचा अध्यक्ष करावे. तसेच काँग्रेसने 50 टक्के उमेदवारी मुस्लीम समुदायाला द्यावी. काँग्रेसला हे सर्व काही करायचे नाही, केवळ नागरिकांचे अधिकार हिरावून घ्यायचे आहेत. काँग्रेसला कुणाचेच कल्याण करायचे नाही. वक्फच्या नावावर लाखो हेक्टर भूमीचा प्रामाणिकपणे वापर झाला असता तर मुस्लीम युवांचे कल्याण झाले असते असे उद्गार मोदींनी काढले आहेत.
भाजपकडून 11 कोटी शौचालयांची निर्मिती
70 वर्षांपर्यंत काँग्रेसने शासन केले आणि केवळ 16 टक्के लोकांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविले. याप्रकरणी झालेल्या दुर्लक्षाचा सर्वाधिक फटका अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींना बसला. काँग्रेसला दलित-गरीबांची जर इतकी चिंता होती, तर त्याने त्यांच्या घरांपर्यंत पाणी पोहोचविले असते. भाजप सरकारने आतापर्यंत देशात 12 कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचविले आहे. गावांमधील 80 टक्के घरांना पाणी मिळत आहे. शौचालय नसल्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसह गरीबांच्या घरांमध्ये वाईट स्थिती होती. भाजपने 11 कोटीहून अधिक शौचालयांची निर्मिती करविली. वंचितांना चांगले जीवन मिळवून दिले. भाजप सरकारमुळे आता प्रत्येक गरिबाच्या खिशात रुपया कार्ड आहे. सर्वाधिक जनधन खात्याचे लाभार्थी अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीचे लोक असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
काँग्रेसला केवळ सत्तेचे सोयरसुतक
2014 नंतर भाजपने डॉ. आंबेडकर यांची प्रेरणा आगामी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पावले उचलली आहेत. काँग्रेसने डॉ. आंबेडकर आणि चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देणे टाळले होते. काँग्रेसला केवळ सत्तेचे सोयरसुतक असल्याचे मोदींनी म्हटले आहे.









