मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा वास्कोत आरोप : ‘फिर से मोदी सरकार’साठी साथ देण्याचे आवाहन
वास्को : काँग्रेस पक्षाने या देशात केवळ जाती धर्माचे राजकारण केले. फक्त स्वत:चा विकास साधला, जनतेचा नाही. देशात काँग्रेस सत्ता काळातील विकास आणि भाजपाच्या मागच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळातील विकास याची तुलना होऊ शकत नाही. विकासासाठी भाजपाच पर्याय असून देशाची भरभराट व्हावी, देश आत्मनिर्भर व्हावा, देश जागतिक आर्थिक सत्ता व्हावी यासाठी ‘फिर से मोदी सरकार’ ही घोषणा सत्यात उतरणे आवश्यक असून जनतेने पंतप्रधान मोदींना पुन्हा साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वास्कोत केले. गोवा सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वास्कोत भाजपातर्फे काल रविवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या व्यासपीठावर खासदार व भाजपा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, अनिवासी भारतीय आयोगाचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र सावईकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीष बोरकर, जिल्हा पंचायत सदस्य अॅड. अनिता थोरात, माजी आमदार दामू नाईक, नगरसेवक दीपक नाईक व मान्यवर उपस्थित होते. तानिया हॉटेलसमोरील मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसवर चौफेर टीका
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देशाच्या काँग्रेस सत्ता काळातील अपयशावर चौफेर टीका केली. ते म्हणाले की काँग्रेसने या देशावर अनेक दशके राज्य केले. मात्र, त्यांना देशाचा विकास साध्य करता आला नाही. केवळ गरीबी हटावचा नारा दिला. मात्र, जनतेची परिस्थिती बदलली नाही. काँग्रेसने केवळ जाती धर्माचे राजकारण केले. लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून सत्ता प्राप्त करण्याचे राजकारण केले. या देशाच्या जनतेला खरा विकास काय असतो हे 2014 साली भाजपाचे सरकार सत्तेवर येताच कळले. काँग्रेस काळातील सत्ता आणि भाजपाच्या काळातील सत्ता यांची विकासाच्या बाबतीत तुलनाच होऊ शकत नाही.
देशाला, जगाला प्रभावित केले
2014 ते 2024 हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहा वर्षांचा सत्ताकाळ देशातील जनतेला प्रभावीत करणारा ठरलेला आहे. भाजपाचे सरकार हे समाजातील सर्व घटकांचे आहे. या सरकारने जाती धर्मात भेदभाव केलेला नाही. सबका साथ सबका विकास हेच सरकारचे ब्रिद आहे. समाजातील सर्वच घटकांपर्यंत सरकारने विकासाच्या योजना पोहोचवलेल्या आहेत. गरीबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी सरकार झटत आहे. काँग्रेसने आपल्या काळातील विकास सिध्द करावा, जनतेसाठी विकासाच्या योजना यशस्वी केल्याचे सिध्द करावे, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले.
देशात आणली भरभराट
काँग्रेसच्या काळात या देशात वैद्यकीय महाविद्यालयांची कमतरता होती, विमानतळांची वानवा होती. आज या क्षेत्राची भराभराट झालेली आहे. रेल्वे, रस्ते, हवाई सेवेची भरभराट झालेली आहे. भाजप सरकारने सर्वसामान्यांच्या शौचालयाच्या व्यवस्थेकडेही लक्ष दिले. देशाला स्वच्छतेचा मंत्र दिला. नारी शक्ती वंदनीय ठरवली. राजकारणात त्यांच्यासाठी 33 टक्के राखीवता बहाल केली.
मोदी जगात ठरले वंदनीय
गृह बांधणी, जल,वीज या मुलभूत गरजांचा विकास केला. या माध्यमांतूनच सरकारने देशाचा सर्वांगीण विकास केला. केवळ साधनसुविधाच नव्हे तर औद्योगिक विकास साध्य करून युवकांना रोजगार उपलब्ध केला. पंतप्रधान मोदीनी देशाला दिलेला शब्द सार्थ करून दाखवला आहे. आज ते जगात अभिनंदनीय ठरलेले आहेत. मोदींनी काश्मीरला विशेष कलमातून मुक्त केले. त्यामुळे काश्मीरमध्येही विकासाचे पर्व सुरू झालेले आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी देशाच्या आर्थिक विकासाचीही माहिती दिली. श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार केल्याप्रती अभिमान व्यक्त केला. पंतप्रधानांना नवभारत घडवायचा आहे. मोदींची गॅरेंटी सार्थ ठरलेली आहे. विकसीत भारतासाठी, आत्मनिर्भर भारतासाठी आणि स्वंयपूर्ण गोव्यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशाला पुन्हा गरज असून फिर एक बार मोदी सरकार घडविण्याची गरज आहे. गोव्यातील जनतेने दक्षिण आणि उत्तर गोव्यात पुन्हा एकदा कमळ फुलवावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. खासदार सदानंद शेट तानावडे यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या विकासाचा आढावा घेतला. मंत्री माविन गुदिन्हो यांनी कोंकणी व हिंदीतून केंद्र व राज्य सरकारचा विकास मांडला. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मागच्या दहा वर्षांत जगात भारताचे उंचावलेले स्थान, जागतिक पातळीवरील भारताचे काम याविषयी माहिती दिली. आमदार संकल्प आमोणकर व आमदार दाजी साळकर यांचीही यावेळी भाषणे झाली. रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर गौरीश नाईक यांनी आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले. ही रूग्णवाहिका आमदार दाजी साळकर यांनी वास्कोतील जनतेसाठी उपलब्ध केली आहे.









