वृत्तसंस्था / मुंबई
गेल्या रविवारी डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने कडव्या द. आफ्रिकेचा पराभव करत आयसीसीच्या विश्वचषकावर पहिल्यांदाच नाव कोरण्याचा पराक्रम केला. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे जगभरात कौतुक करण्यात आले. महाराष्ट्राच्या कॅबिनेटने भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखाली या ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या कामगिरीबद्दल खास अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे भारतीय महिला क्रिकेट संघात स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्ज आणि राधा यादव या तीन महाराष्ट्रातील खेळाडूंचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनातर्फे या खेळाडूंना रोख रकमेच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. पण बक्षिसाची नेमकी रक्कम जाहीर करण्यात आली नाही.









