वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय युवा महिला क्रिकेट संघाचे टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळविल्यानंतर खास अभिनंदन केले. ‘या स्पेशल विजयाबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन! अतिशय उत्तम प्रदर्शन करीत त्यांनी हे यश मिळविले असून या यशाने नवोदितांना निश्चितच प्रेरणा मिळेल. असेच यश भविष्यातही मिळवावे, यासाठी शुभेच्छा,’ असे पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.

बीसीसीआयकडून विजेत्या संघाला 5 कोटी जाहीर
यू-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱया युवा महिला क्रिकेट संघाचे बीसीसीआयनेही अभिनंदन केले असून सचिव जय शहा यांनी पूर्ण संघाला 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भारताने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा 7 गडय़ांनी पराभव करून ही पहिली स्पर्धा जिंकली. भारतीय महिलांनी जिंकलेली ही आयसीसीची पहिलीच स्पर्धा आहे. ‘भारतातील महिला क्रिकेटने चांगली प्रगती केली असून या जेतेपदाने महिला क्रिकेटचा दर्जा आणखी उंचावला आहे. संपूर्ण टीम व साहाय्यक स्टाफसाठी 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करताना मला आनंद होत आहे. भारतासाठी हे चाकोरी मोडणारे वर्ष आहे,’ अशा शब्दांत शहा यांनी संघाचे कौतुक केले. 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये पुरुषांचा तिसरा टी-20 सामना होणार आहे, या सामन्यासाठी विजेत्या भारतीय महिला युवा संघाला त्यांनी निमंत्रितही केले आहे. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.









