भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ठराव
प्रतिनिधी / पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात होत असलेला विकास आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत नवीन टप्पे पूर्ण होत असल्याबद्दल प्रदेश भाजप कार्यकारिणीने समाधान व्यक्त केले असून सरकारचे अभिनंदन केले आहे. भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक काल गुरुवारी पणजीत पार पडली, त्यात अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व जनादेश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी नुकतीच आपल्या कारकिर्दीची वर्षपूर्ती केली आहे. त्याशिवाय त्यांच्या कारकिर्दीतील राज्याचा सलग पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. प्रत्येक अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने जनतेच्या आशा आकांक्षांची पूर्ती करणारा ठरला आहे, याबद्दलही राज्य कार्यकारिणीने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
कार्यकारिणीने घेतलेल्या अन्य अभिनंदन ठरावांमध्ये, भावी पिढीच्यादृष्टिने व भातशेती आणि खाजन जमिनीच्या समृद्ध वारशाचे रक्षण, जतन करण्याच्या उद्देशाने भातशेती जमिनीची विक्री आणि ऊपांतरण करण्यावर कडक निर्बंध घालणे, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसी आणि एससी, एसटी विद्यार्थ्यांना 41 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणे, जी-20 गटांच्या आठ महत्त्वाच्या बैठकांचे गोव्यात आयोजन करून जागतिक पातळीवर गोव्याची प्रतिमा वाढविण्यात आणि मजबूत करण्यात मदत करणे, खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून काही खाण ब्लॉक्सचे लिलावाद्वारे वाटप करणे यासारख्या काही ठरावांचा समावेश आहे.
त्याशिवाय गोव्याची जीवनरेखा म्हादई नदीशी संबंधित कर्नाटक राज्याच्या डीपीआरला केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली आहे. अशावेळी म्हादई नदीच्या पाण्यावरील गोव्याचे कायदेशीर हक्क आणि हीत जपण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलणे व कायदेशीर लढा देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना कार्यकारिणीने पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.









