वृत्तसंस्था/ अॅडलेड
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार सविता पुनियाने आपल्या वैयक्तिक हॉकी कारकीर्दीमध्ये 250 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा पल्ला गाठल्याबद्दल हॉकी इंडियाने तिचे खास अभिनंदन केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सविता पुनियाकडे सोपविण्यात आले आहे. रविवारचा खेळवण्यात आलेला तिसरा हॉकी कसोटी सामना हा कर्णधार सविता पुनियाचा 250 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. सविताने 2009 साली दरबान येथे झालेल्या महिलांच्या चौरंगी स्पार चषक हॉकी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय हॉकी पदार्पण केले होते. सविताने आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर गेली अनेक वर्षे भारतीय संघातील आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. सविताने आपल्या वयाच्या 20 व्या वर्षी देशाच्या वरिष्ठ संघामध्ये पदार्पण केले. 2013 साली मलेशियात झालेल्या महिलांच्या आठव्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत कास्यपदक मिळवणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघामध्ये सविताचा समावेश होता. तिने कास्यपदकासाठीच्या सामन्यात पेनल्टी शुटआऊट दरम्यान भक्कम गोलरक्षण केल्याने भारताला कास्यपदक मिळवता आले होते. 2017 साली कॅनडामध्ये झालेल्या हॉकी विश्व लिग राऊंड 2 स्पर्धेत सविताची सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. 2016 साली आशियाई चॅम्पियनशिप महिलांची हॉकी स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघात तिचा समावेश होता.
32 वर्षीय सविता पुनियाने जवळपास गेल्या दशकामध्ये आपल्या शानदार खेळाच्या जोरावर अर्जुन पुरस्कारही मिळवला आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक चौथे स्थान मिळवणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघामध्ये तिचा समावेश होता. 2022 साली बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कास्यपदक मिळवणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सविता पुनियाने केले होते. हॉकी इंडिया, साई आणि ओदिशा शासनाकडून मला सातत्याने सहकार मिळाल्याबद्दल सविता पुनियाने त्यांचे आभार मानले आहेत. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्कीने सविता पुनियाचे खास अभिनंदन केले आहे.









