रोहित शर्मा व डेव्हिड बेकहॅम एकमेकांच्या जर्सीसह
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतात सध्या सुरू असलेल्या 2023 च्या आयसीसी विश्व चषक क्रिकेट स्पर्धेतील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्यफेरीच्या सामन्याला इंग्लंडचे शौकीन तसेच क्रीडा क्षेत्रातील अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान ब्रिटनच्या फुटबॉल क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आणि माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमने आपली उपस्थिती दर्शविली होती. बेकहॅमने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासमवेत आपले छायाचित्र घेतले असून दोघांचे हे छायाचित्र फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आले. बेकहॅमने रोहित शर्माला या स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डेव्हिड बेकहॅम आणि रोहित शर्मा यांनी या भेटीमध्ये परस्परांच्या जर्सी भेट म्हणून दिली. बेकहॅम रोहित शर्माची 45 क्रमांक असलेली भारतीय संघाची जर्सी परिधान करून वावरत होता. तर हिटमॅन रोहित शर्माने बेकहॅमच्या 23 क्रमांकाच्या जर्सीचे महत्त्व तत्कालीन स्पॅनिश फुटबॉल क्षेत्रातील रियल माद्रीद फुटबॉल क्लबचे प्रतिनिधीत्व करताना जागतिक फुटबॉल क्षेत्राला होते असे सांगितले. बेकहॅम आणि रोहित शर्मा यांनी एकत्रितपणे कांही कालावधी घालविला. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराची भेट मिळाल्याबद्दल आपण धन्य झालो आहोत, अशी प्रतिक्रिया बेकहॅमने व्यक्त केली. विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान अहमदाबाद येथे रविवार 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बेकहॅमने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहित शर्माने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत नेहमीच संघाच्या डावाला भक्कम सुरूवात करून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याने आतापर्यंत 461 आंतरराष्ट्रीय सामन्यात 18192 धावा जमविताना 45 शतके आणि 100 अर्धशतकांची नोंद केली आहे. क्रिकेट क्षेत्रामध्ये सर्वकालीन पहिल्या पाच क्रिकेटपटूंमध्ये रोहितचा समावेश केला जातो. क्रिकेटच्या वनडे प्रकारात भारतीय कर्णधार रोहित शर्माने 261 सामन्यात 10662 धावा जमविताना 31 शतके आणि 55 अर्धशतके झळकविली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा जगातील फलंदाज असून त्याच्या नावावर आतापर्यंत 579 षटकारांची नोंद आहे. शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 2018 आणि 2023 साली दोन वेळेला आशिया चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. तसेच त्याने मुंबई इंडियन संघाचे नेतृत्त्व करताना पाच वेळेला आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद आपल्या संघाला मिळवून दिल्याने तो सध्या जागतिक क्रिकेट क्षेत्रात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्यफेरीच्या सामन्यावेळी ब्रिटनचा माजी फुटबॉल कर्णधार डेव्हिड बेकहॅमने आपली उपस्थिती दर्शवून क्रिकेटचा आनंद लुटला. बेकहॅम युनिसेफचा सदिच्छा अॅम्बेसिडर (प्रतिनिधी) म्हणून कार्यरत आहे. क्रिकेट या क्रीडा प्रकाराला विविध देशांमध्ये अधिक प्रसिद्धी मिळावी तसेच महिला आणि मुलींच्या विभागातही या क्रीडा प्रकाराचा प्रसार झपाट्याने करण्याच्या हेतूने आयसीसीने युनिसेफ बरोबर करार केला असल्याने युनिसेफचा प्रतिनिधी म्हणून बेकहॅम भारतात दाखल झाला होता. 1996 ते 2009 या कालावधीत डेव्हिड बेकहॅमने इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किमान 100 सामन्यात आपल्या दर्जेदार खेळाची ओळख करून दिली आहे.









