प्रतिनिधी/ पणजी
भाजपचे धडाडीचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांच्यावर काल त्यांच्या वाढदिनी राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सरकारमधील सर्व मंत्री, आमदार, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहते, आणि हितचिंतकांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.
श्री. नाईक यांनी सर्वप्रथम सकाळी हरवळे सांखळी येथे देव श्रीरूद्रेश्वर मंदिरात भेट दिली. तेथे त्यांनी सपत्निक पूजा, अभिषेक करून देवतांचे आशीर्वाद घेतले व आपल्या दिवसाची सुऊवात केली. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सुलक्षणा सावंत, खासदार सदानंद तानावडे यांच्यासह माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, श्याम सातार्डेकर, जयेश साळगावकर, माजी आमदार किरण कांदोळकर, नरहरी हळदणकर, यांची उपस्थिती होती. त्याशिवाय देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर, दयानंद कारबोटकर, सुशांत पेडणेकर, भंडारी समाजाचे पदाधिकारी, नेते तसेच मोठ्या संख्येने चाहते यांचीही उपस्थिती होती.
‘27 मध्ये 27‘ साठी यशप्राप्तीची प्रार्थना
तत्पूर्वी दामू नाईक यांनी बोलताना, येत्या विधानसभा निवडणुकीत ‘27 मध्ये 27‘ हा नारा प्रत्यक्षात आणण्यात यश प्राप्त व्हावे, अशी प्रार्थना आपण देव ऊद्रेश्वरचरणी केल्याचे सांगितले. याकामी भाजपमधील नवे तसेच जुने जाणते अनुभवी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एकत्र आणण्याचा संकल्प असून तो पूर्ण करण्यासाठी देव श्रीरूद्रेश्वराने बळ आणि यश द्यावे, त्याचबरोबर गोमंतकीय जनतेला सुखसमृद्धी प्राप्त व्हावी यासाठी साकडे घातल्याचे नाईक यांनी पुढे सांगितले.
हरवळे येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री. नाईक यांनी डिचोली येथील केशव सेवा साधना शाळेस भेट देऊन तेथील विशेष मुलांसोबत काही क्षण घालविले. तेथून सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते पणजीत दाखल झाले व पणजीची ग्रामदेवता श्रीमहालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते भाजप मुख्यालयात दाखल झाले. त्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी जल्लोष करत घोषणाच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
वाढदिवसानिमित्त तेथे खास उभारण्यात आलेल्या शामियानात केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते नाईक यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी दामू यांनी चरणस्पर्श करून मंत्री नाईक यांचे आशीर्वाद घेतले.
पणजीत स्वीकारल्या शुभेच्छा
दुपारी 3.30 पर्यंत दामू नाईक यांची तेथे उपस्थिती होती. त्या दरम्यान आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मंत्री नीळकंठ हळर्णकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, मंत्री माविन गुदिन्हो, आमदार प्रेमेंद्र शेट, प्रवीण आर्लेकर, दिव्या राणे, ऊडाल्फ फर्नांडिस, उल्हास तुयेकर, महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह अन्य आमदार, सर्व नगरसेवक, पक्षाचे नवे, जुने जाणते असे जवळजवळ सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाय भाजपच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती होती.
मडगावला प्रयाण
श्री. नाईक यांनी नंतर तेथून मडगावसाठी प्रयाण केले व प्रथम मातृछाया संस्था, पिंपळकट्टा शिवलिंग, पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव यांना भेट दिली. त्यानंतर ते मडगाव तथा दक्षिण गोव्यातील कार्यकर्ते, हितचिंतक यांच्यासाठी उपलब्ध झाले. त्याप्रित्यर्थ फातोर्डा येथील सम्राट गार्डनमध्ये भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तेथे रात्री उशिरांपर्यंत उपस्थित राहून त्यांनी सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.









