काल अफगाणिस्तान संघाने विजय मिळवल्यानंतर, मला आठवण झाली ती सुनील गावस्कर यांचे वडील मनोहर गावस्कर यांची. काही वर्षांपूर्वी मुंबई विरुद्ध दिल्ली रणजी करंडक सामन्याचे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरून आकाशवाणीवरुन धावते समालोचन करून मी माझ्या घरी पोहोचलो. त्याच दिवशी संध्याकाळी वेंगुर्ले येथील एका टेनिस क्रिकेटच्या अंतिम सामन्यासाठी समालोचनासाठी गेलो होतो. त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी सुनील गावस्कर यांचे वडील मनोहर गावस्कर उपस्थित होते. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले होते की कुठल्याही संघाला तुम्ही कमी लेखू नका. विशेषत: कमकुवत संघाला नकोच नको. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे परवाचा अफगाणिस्तान व इंग्लंड यांच्यात झालेला सामना. आम्हाला कमी लेखला तर काय होईल हे त्यांनी काल दाखवून दिले.
दिल्लीचे तख्त राखणं कोणाला नाही आवडणार? भले ते राजकारण असो अथवा क्रिकेट. एखाद्या व्यक्तीने आपला रुमाल खिशात टाकावा तसा हा सामना अफगाणिस्तानी संघाने आपल्या खिशात टाकला. अर्थात हा सामना आपल्या हातातून कसा निसटला हे शेवटपर्यंत गोऱ्यांना समजलंच नाही. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे लिंबूटिंबू संघापासून सावध राहावं लागतं. हे ज्या संघाला उमगलं तोच संघ दोन पावलं पुढे जातो हे आपण वारंवार बघितले आहे. असे दुबळे संघ कधी प्रतिस्पर्ध्याचे दिवाळं काढतील हे सांगता येत नाही. बरं, कमकुवत संघाकडून द्विपक्षीय मालिकेत पराभव स्वीकारणं ही वेगळी बाब. परंतु विश्वचषकासारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्राथमिक फेरीत दोन सामन्यापैकी एका सामन्यात पराभव पत्करल्यानंतर ज्यावेळी लिंबूटिंबू संघ तुमचा पराभव करतो त्या सारखं दुर्दैव ते कुठलं? परंतु असा पराभव पहिल्यांदा झाला असेही नाही. या अगोदर 2011 सालच्या विश्वचषकाच्या स्पर्धेत इंग्लंडला आयर्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वचषकात लिंबूटिंबू संघाकडून पराभव पत्करल्यानंतर काय परिस्थिती होते ती भारतीय संघाला विचारा. आठवलं का? नाही आठवलं तर सांगतो. 2007 मध्ये बांगलादेशकडून आपण पराभूत झालो होतो आणि तिथेच आपण स्पर्धेच्या बाहेर गेलो होतो. नेमकी अशीच परिस्थिती मागील विश्वविजेत्यांवर न येवो म्हणजे इंग्लंडने मिळवलं. दिल्लीत एक असा इलाका आहे जिथे अफगाणिस्तानचे रहिवासी बऱ्यापैकी आहेत. परवा ते निश्चितच खुश असतील. मागील विश्वविजेत्यांना इंग्लंडला जे पराभूत केलं.
सद्यस्थितीत झटपट क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानकडे यशस्वी मंदगती गोलंदाजांचा ताफा आहे. भलेही शेन वॉर्न, मुरलीधरन, अश्विन यांच्यासारखी गुणवत्ता नसेलही, परंतु प्रतिस्पर्धी संघाला पराभवाचं भूत दाखवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निश्चित आहे. मुजीब रहमान, रशीद खान व मोहम्मद नबी या फिरकीपटूंनी जी कामगिरी केली त्याला अर्थातच तोड नाही. यापुढे इंग्लंडचे फलंदाज क्लब क्रिकेटमध्ये मंदगती गोलंदाजाकडे आदराने बघायला लागले तर आश्चर्य वाटायला नको. अर्थात या इंग्लंडच्या पराभवामुळे दिग्गज संघांना सावध पावलं उचलावीच लागतील. अफगाणिस्तानसारखे संघ ज्यावेळी इंग्लंडसारख्या दिग्गज संघाला पराभूत करतात, त्यावेळी विश्वचषकाचे जे चित्र असते ते 360 डिग्रीमध्ये फिरते. लिंबूटिंबू संघाकडून किती धोका आहे हे काल इंग्लिश संघाने चांगलंच अनुभवलं असेल. या विजयानंतर मला मंगेश पाडगावकर रचित यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अरुण दाते यांनी गायलेलं गीत आठवलं, दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे, हे गीत आठवलं. अफगाणिस्तान संघाचे फुलायचे आणि झुलायचे दिवस आलेत की नाही यावर मतमतांतर असू शकतील. परंतु विश्वचषकात आमच्यापासून सावध राहा, अन्यथा आमच्याकडून पुढे धोका आहे. अर्थात हे अफगाणी वादळ कोणाकोणाला नेस्तनाबूत करते, हे येणारा काळच ठरवेल.









