काही शाळा सकाळी तर काही पूर्णवेळ : पालकांची तारेवरची कसरत
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाळ्यात शाळांना देण्यात आलेली सुटी भरपाई करण्यासाठी शैक्षणिक जिल्ह्यात शनिवारपासून पूर्ण दिवस शाळा घेण्याचा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावला होता. परंतु शिक्षक संघटनांच्या मागणीमुळे संभ्रम निर्माण झाला. यामुळे शहरासह ग्रामीण भागात सरकारी शाळा सकाळी तर अनुदानित व विनाअनुदानित शाळा मात्र दिवसभर सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
जुलै महिन्याच्या अखेरीला झालेल्या धुवाधार पावसामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बेळगाव शहर, ग्रामीणसह खानापूर तालुक्याला तब्बल आठवडाभर सुट्या द्याव्या लागल्या. सुट्या देतानाच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भरपाई सुट्या नंतर भरविल्या जातील, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार शनिवार दि. 17 पासून पुढील चार आठवडे पूर्ण दिवस शाळा भरविण्याचा आदेश जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांनी गुरुवार दुपारी काढला.
शनिवारी 17 पासून अंमलबजावणीच्या सूचना
कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्या बेळगाव विभागाच्यावतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत सुटी भरपाईची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून करावी, अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत जिल्हाशिक्षणाधिकारी बेळगाव शहर व ग्रामीण विभाग वगळता इतर भागात शनिवार दि. 17 पासून अंमलबजावणीच्या सूचना दिल्या होत्या.
संभ्रमामुळे पालकांमध्ये नाराजी
शनिवारी सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळा नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रात भरल्या तर अनुदानित, खासगी व विनाअनुदानित शाळा मात्र दिवसभर सुरू होत्या. त्यामुळे पालकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे सरसकट एकच निर्णय घेणे गरजेचे होते, असे मत पालकवर्गातून व्यक्त होत होते.









