पुणे / प्रतिनिधी :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ धंगेकरांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने रासने यांना मोठा धक्का मानला जात असतानाच या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गोडसे यांच्या परिवाराने भाजपचे उमेदवार आणि मंडळाचे विश्वस्त हेमंत रासने यांना पाठिंबा असल्याचे घूमजाव केल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान, गोडसे यांनी काही वेळातच बदललेल्या त्यांच्या भूमिकेमुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.
कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार असलेले हेमंत रासने हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस असताना गोडसे यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने भाजपच्या गोटात खळबळ माजली होती. महाविकास आघडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे आणि माझ्या परिवाराच गेल्या अनेक वर्षाचे नाते आहे. माझे आजोबा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्यापासून ते अशोक गोडसे आणि माझ्यापर्यंत त्यांचे अत्यंत स्नेहाचे नाते आहे. तात्यासाहेब यांच्या प्रत्येक वाढदिवसाला धंगेकर हे तब्बल एक हजार भगवद्गीतेची पुस्तके त्यांच्या प्रभागात वाटत होते. गेली अनेक वर्ष त्यांचे आणि आमचे स्नेहाचे संबंध आहेत. आमच्या परिवाराचे त्यांना पाठबळ आहे, असे अक्षय गोडसे यांनी त्यांच्या पहिल्या व्हिडिओत म्हटले होते.
अधिक वाचा : सध्याच्या संयुक्त राष्ट्रसंघात जगाचे वास्तव नाही
मात्र नंतर ही भूमिका बदलली. आम्ही अनेक दिवस हेमंतभाऊंसाठी काम करत आहोत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. मात्र, मतभेद दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. कारण नसताना समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण असे कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही त्यांच्या प्रचारात आहोत. माझ्या कुटुंबाकडून हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा आहे,’ असे घूमजाव गोडसे यांनी केले. त्यावरून एकूणच संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले.








