अमेरिकेतील घटना ः आयोजकांनी बाहेर हाकलले
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये नॅशनल प्रेस क्लबमध्ये काश्मीरसंबंधी आयोजित चर्चेदरम्यान पाकिस्तानी अधिकाऱयांनी गोंधळ घातला आहे. प्रेस क्लबमध्ये एका चर्चासत्रासाठी काश्मीरमधील युवा नेत्यांना आमंत्रित करण्यात आले हेते. या चर्चासत्रात काश्मीरमध्ये घडून आलेल्या बदलावर मते मांडली जात होती. या चर्चासत्रादरम्यान काही पाकिस्तानी अधिकाऱयांनी आरडाओरड सुरू केल्याने आयोजकांनी त्यांना बाहेर हाकलले. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
वॉशिंग्टमध्ये आयोजित चर्चासत्राचा विषय ‘काश्मीर – फ्रॉम टर्मोइल टू ट्रान्सफॉर्मेशन’ असा होता. या चर्चासत्रासाठी इंटरनॅशनल सेंटर फॉर पीस स्टडीजने काश्मीर खोऱयातील 2 युवा नेते जम्मू-काश्मीर वर्कर्स पार्टीचे अध्यक्ष मीर जुनैद आणि तौसीफ रैना यांना आमंत्रित केले होते.
काश्मीरमध्ये आता शांतता आणि समृद्धी असल्याचे मी विश्वासपूर्वक म्हणू शकतो. जम्मू-काश्मीरने मागील काही काळात अनेक बदल पाहिले असून यामुळे आता ते एक विकासाभिमुख केंद्रशासित प्रदेश ठरत असल्याचे उद्गार मीर जुनैद यांनी काढले आहेत.
काही देशांकडून चिथावणी
काही देश जागतिक व्यासपीठांवर जगालाच मूर्ख करू पाहत आहेत. अशा देशांचे काश्मीरमधील शांतता, समृद्धी आणि विकासाशी कुठलेच देणेघेणे नाही. हे देश केवळ काश्मीरमधील हिंसा घडवून आणू पाहत आहेत. काश्मीरमध्ये हिंसा घडवून आणणारे लोक आता विरोध अन् कठोर कायद्यांना सामोरे जात आहेत, याचमुळे तेथे हुर्रियत कॉन्फरन्स कोलमडल्याचे जुनैद यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानला पोटशूळ जुनैद यांच्या वक्तव्यानंतर तेथे उपस्थित पाकिस्तानी अधिकारी बिथरले आणि त्यांनी व्यासपीठावर चढून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान तेथे सुरक्षा कर्मचाऱयांनी धाव घेत गोंधळ घालणाऱया पाकिस्तानी अधिकाऱयांना बाहेर हाकलले आहे. पाकिस्तानी अधिकाऱयांनी जुनैद यांना शिविगाळ केल्याचे या व्हिडिओत दिसून येते. या गोंधळानंतर काश्मीरच्या युवा नेत्याने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे.









