रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमधील प्रकार, ताकीद देऊनही पुरवठादार संस्था बेदरकार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील शालेय पोषण आहार वाटपातील गोंधळ थांबण्याची चिन्हे नाहीत. पटवर्धन हायस्कूल येथे शनिवारीही दर्जाहीन आहार वाटप झाल्याची बाब प्रशासनस्तरावरून नेमण्यात आलेल्या पथकाच्या निदर्शनास आली. त्यामुळे आहार पुरवठादार ठेकेदार संस्थांच्या गलथान कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील शाळांमध्ये सेंट्रल किचन पध्दतीने पोषण आहार पुरवठय़ाच्या पहिल्याच दिवशी येथील शिर्के प्रशाला, त्यानंतर तिसऱया दिवशी दामले हायस्कूलमध्ये अनियमितता आढळून आली. अर्धवट शिजलेला व दर्जाहीन पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत होता. या बाबत शाळांकडून प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर पटवर्धन हायस्कूल येथेही अपुरा आहार पुरवठा झाला होता. दरम्यान पटवर्धन हायस्कूल येथे एका विद्यार्थ्यांच्या आहारात अळीही सापडली होती. त्याची तक्रार नगर परिषद प्रशासनाच्या अधिकाऱयांकडे करण्यात आली होती.
आहार वाटपात सातत्याने होत असलेली अनियमितता, गोंधळ व दर्जाहीनतेवर नजर ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने पथकाची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना आहार वाटपाची पाहणी त्या-त्या शाळांना भेटी देऊन केली जाणार आहे. या पथकामध्ये नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली कर प्रशासकीय अधिकारी आय. व्ही. चाळके, मालमत्ता पर्यवेक्षक नंदकुमार पाटील या अधिकाऱयांचा समावेश आहे.
या पथक तसेच शिक्षकांमार्फत पोषण आहार पुरवठय़ावर नजर ठेवण्यात येत आहे. शनिवारी शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे या पथकाने भेट देत आहाराच्या दर्जाची पाहणी केली. यावेळी आहारातील वरण दर्जाहीन असल्याची बाब समोर आली. त्या बाबतचा अहवाल शिक्षकांनी पथकाला दिला आहे. आहार पुरवठय़ातील गोंधळाची गंभीर दखल प्रशासनस्तरावरून घेण्यात आली. कोल्हापूरच्या संबंधित ठेकेदाराला तातडीने 2 नोटीसा बजावण्यात आल्या असून 3 नोटीस दिल्यानंतर ठेका रद्द केला जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सूचित केले होते. त्यानंतर आता सांगली येथील ठेकेदार संस्थेमार्फतही आहार पुरवठय़ाचा गोंधळ सुरू झाला आहे. पटवर्धन हायस्कूलमधील प्रकाराचा अहवाल नगर परिषद प्रशासनाकडे देण्यात येणार आहे.









