जाणुनबुजून मराठी भाषिकांना लक्ष्य बनविण्यासाठी प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठीबहुल असलेल्या शहरासह सीमाभागामध्ये मराठी भाषिक व्यावसायिक आपल्या इच्छेनुसार सर्व भाषांमध्ये फलक लावत आहेत. मात्र, जाणुनबुजून मराठी भाषिकांना लक्ष्य बनविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शनिवारी पुन्हा मूठभर कन्नड दुराभिमानी तरुणांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची भेट घेऊन 60 टक्के कन्नड राखीव ठेवण्याचा आदेश बजावावा, अशी मागणी केली. यावेळी आयुक्तांनीही निश्चितच याबाबत पाऊल उचलू, असे आश्वासन त्यांना दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये जाणुनबुजून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारने यापूर्वीच कोणत्याही फलकावर 60 टक्के कन्नडमध्ये लिहिण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अनेकांनी फलक लावले आहेत. मात्र, जाणुनबुजून मराठी भाषिकांना त्रास देण्यासाठी मूठभर कन्नड तरुण एनकेन प्रकारे वातावरण बिघडवत आहेत. यामुळे व्यावसायिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी केवळ 16 कार्यकर्ते महापालिकेसमोर आंदोलन करत होते. त्यांना संरक्षण देण्यासाठी 25 हून अधिक पोलीस होते. त्यामुळे पोलीस संरक्षणातच कन्नड कार्यकर्ते मागणी करत असल्याचे दिसून आले. एकूणच व्यावसायिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जनतेतून करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्तांकडून तातडीने आदेश जारी
कन्नड संघटनांनी निवेदन देताच महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहरातील व्यावसायिकांनी 60 टक्के कन्नड लिहिलेला फलक लावावा, असा आदेश जारी केला आहे. कोणतेही काम करण्यास किंवा समस्या सोडविण्यास बराच विलंब लावला जातो. मात्र, महापालिका आयुक्तांकडून तातडीने हा आदेश बजावण्यात आला आहे.









