राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये पुण्यात झालेल्या भेटीने महाविकास आघाडीत पुन्हा संभ्रम निर्माण झाला असून, शरद पवारांच्या वारंवार अशा भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीतील तसेच राष्ट्रीय पातळीवरील भाजप विरोधी इंडिया आघाडीत त्यांच्या नेतृत्वाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे आज आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असलो आणि प्रजासत्ताक भारतात लोकशाही मानून वाटचाल करत असलो तरी महाराष्ट्राला अजूनही स्थिर सरकार मिळालेले नसून महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी कधी नव्हे ती गेल्या साडे चार वर्षात खालावली असून कधी काय घडू शकते याचा नेम नाही, त्यामुळे आज 15 ऑगस्टला झेंडावंदन करणारा मुख्यमंत्री पुढच्या 26 जानेवारीपर्यंत राहील का? हा मोठा प्रश्न आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात तीन वेळा भेटी झाल्या. त्यामुळे उभयतांच्या भेटीमुळे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहे. पहिला अर्थ म्हणजे अजित पवारांनी बंड केले, पण त्यांना अजूनही पुरेशा आमदारांचा पाठिंबा मिळाला नसल्याचे दिसते. कारण अजित पवार गटाकडून अजूनही त्यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही, याबाबत विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनीदेखील आपल्याकडे पूर्वीचीच राष्ट्रवादीच्या आमदारांची माहिती असल्याचे पावसाळी अधिवेशनापूर्वी सांगितले होते. दुसरं कारण म्हणजे अजित पवारांनी बंड केले. सर्वाधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावाही केलाय. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावाही केलाय. पण, अजित पवारांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अपेक्षित पाठिंबा मिळताना दिसत नाही, त्यामुळेच शरद पवारांना सोबत घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आपण शरद पवारांना सोडलं नाही, हे सातत्याने दाखवत आहे. त्यांच्या गटाकडून मुद्दामहून शरद पवारांचा फोटो वापरला जात आहे. अजित पवारांकडून संपूर्ण राष्ट्रवादी भाजपसोबत नेण्यासाठीही प्रयत्न सुरू असून त्यासाठी शरद पवारांची मनधरणी करत असून त्यासाठीच एका उद्योगपतीच्या घरी ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. मात्र शरद पवार हे भाजपसोबत न जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे कळते. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल नेहमी दावा करतात की शरद पवार हे नाममात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी घेतलेले निर्णय लागू होणार नाहीत. मात्र दुसरीकडे अजित पवार हे शरद पवारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे वारंवार ठासून सांगतात. त्यामुळे पक्षातच गोंधळाची स्थिती आहे. राहुल गांधींच्या संसदेतील फ्लाईंग किसवऊन एका आमदाराने राहुल गांधींचे समर्थन करणारे व्ट्टि केल्याने अजित पवारांनी या आमदाराला एकावेळी दोन बोटीत बसण्याचा प्रयत्न करू नका, ज्या बोटीत बसलात त्याचाच विचार करा अशी थेट तंबी दिल्याचे कळते.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमागे भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांना पुन्हा परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे तर दुसरीकडे शरद पवारांसोबत असलेल्या सहकाऱ्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी फास आवळल्याचे दिसत आहे, याची स्वत: शरद पवार यांनीच कबुली दिली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचा दावा अजित पवारांनी केला.त्यानंतर पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार अशा बातम्या आल्या मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर ज्या पध्दतीने दावे-प्रतिदावे करत न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर दोन्ही गट लढले तशी गतीमान प्रकिया राष्ट्रवादीत होताना दिसत नसून हे सगळं पाहता शरद पवार यांच्या मनात नेमके काय आहे? हे सांगणे कठीण आहे. अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी आपण पवार कुटुंबात वडीलधारी असल्याने अजित पवारांनी आपली भेट घेतल्याचे जरी सांगितले असले तरी महाविकास आघाडीसाठीही शरद पवार हे वडीलधारीच आहेत हे त्यांनी विसरता कामा नये. अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्याबाबत आता किंतु परंतु करण्याला वाव नसला तरी शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत आणि शरद पवारांच्या भूमिकेबाबत पक्षात, कार्यकर्त्यांत आणि लोकामंध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच काल अचानक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उध्दव ठाकरे यांची घेतलेली भेट आणि या भेटीत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणारी राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीची बैठक याबाबत जरी चर्चा झाली असली तरी शरद पवारांच्या भूमिकेबाबतही या बैठकीत चर्चा झाली असणार यात शंका नाही तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर थेट शरद पवारांना अजित पवारांच्या माध्यमातून भाजपने केंद्रीय कृषीमंत्री पद आणि निती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला आहे, तर शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपशी हातमिळवणी केली, ते आपले नातेवाईक असू शकत नाहीत. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत चहापान केलं तर…? असा सवाल करताना शिवसेनेचा डीएनए वेगळा आहे. आम्ही असली ढोंगं करणार नाही.
राजकारणातल्या भीष्मपितामहाकडून असं वर्तन अपेक्षित नसल्याचे बोलताना थेट शरद पवारांनाच खडे बोल सुनावले आहेत. आता शरद पवार विरूध्द महाविकास आघाडीतील शिलेदार अशी लढाई बघायला मिळत असून शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट कऊन वेळीच संभ्रम दूर केला पाहीजे अन्यथा जो भाजपविरोधी पारंपारक मतदार आहे जो धर्मनिरपेक्ष आणि शाहु, फुले, आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा मानतो आणि जो नेहमीच राष्ट्रवादीच्या नव्हे तर फक्त शरद पवारांच्या मागे ठामपणे उभा राहत आला तो शरद पवारांच्या अशा भूमिकेमुळे काँग्रेसकडे वळण्यास वेळ लागणार नाही.








